गृहसंकुलांपाठोपाठ चाळी, झोपडपट्टय़ांतही संक्रमण वेगाने

मुंबई : दोन आठवडय़ांपूर्वीपर्यंत मोठी गृहसंकुले आणि इमारतींपुरता मर्यादित असलेला करोना रुग्णांचा प्रसार आता चाळी आणि झोपडपट्टय़ांमध्येही वेगाने होऊ लागला आहे. या परिसरांतील रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्याही वाढू लागली आहे. आजघडीला या प्रतिबंधित क्षेत्रांत वास्तव्य असलेल्या नागरिकांची संख्या सात लाखांहून अधिक आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ापासून मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली असून रुग्णवाढीचा वेग खूप आहे. त्यामुळे दैनंदिन रुग्णांची मोठय़ा संख्येने नोंद होते आहे. पालिकेच्या प्रतिबंधित क्षेत्र व इमारतींमध्येही वाढ होऊ लागली आहे. पाचपेक्षा जास्त रुग्ण एखाद्या मजल्यावर आढळल्यास तो मजला प्रतिबंधित करण्याचा नियम आहे. तसेच तीनपेक्षा जास्त घरांमध्ये जास्त मजल्यांवर रुग्ण असतील तर संपूर्ण इमारत प्रतिबंधित केली जाते. याच नियमानुसार इमारती प्रतिबंधित होत असून त्यांची संख्या वाढत आहे. तर झोपडपट्टी व चाळींमध्ये एक रुग्ण आढळला तरी तो परिसर प्रतिबंधित केला जातो.

पालिकेच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवरील आकडेवारीनुसार, मुंबईत सध्या तब्बल नऊ प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. तर २०३ इमारती व चार हजारांहून अधिक ठिकाणी इमारतींचे मजले प्रतिबंधित आहेत. या सर्व ठिकाणी मिळून सात लाख लोक वास्तव्यास आहेत. प्रतिबंधित विभागांपैकी दोन विभाग हे कुर्ला व चुनाभट्टी परिसराचा भाग असलेल्या एल विभागातील आहेत. प्रतिबंधित क्षेत्रे जास्त दिसत असली तरी कुल्र्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. या विभागात सर्वात कमी दैनंदिन रुग्ण आहेत. दिवसाला केवळ ५० रुग्ण आढळत आहेत. सध्या केवळ सव्वातीनशे उपचाराधीन रुग्ण असून त्यातील केवळ ५० रुग्ण हे झोपडपट्टय़ांमधील आहेत. हा संसर्ग वाढू नये म्हणून विशेष खबरदारी घेत आहेत, असे एल विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र जाधव यांनी सांगितले.

दहा टक्के रुग्ण झोपडपट्टीतील

 मुंबईत सध्या दैनंदिन रुग्णांची संख्या जास्त असली तरी त्यातील केवळ १० टक्के रुग्ण हे झोपडपट्टयांमधील आहेत. मात्र टाळेबंदीचा बराचसा काळ घालवल्यानंतर आता नागरिकांना पुन्हा टाळेबंदीत ठेवणे शक्य नाही. त्यामुळे मध्यममार्ग काढत पालिकेने या झोपडपट्टयांमध्ये प्रतिबंधित क्षेत्राचे नियमन केले आहे. सार्वजनिक शौचालये वारंवार र्निजतुक करणे, बाधित आढळलेल्या रुग्णाला लक्षणे नसली तरी त्यांचे विलगीकरण करणे, लक्षणे असलेल्यांना करोना उपचार केंद्रात पाठवणे, निकट संपर्कातील लोकांच्या जास्तीत जास्त चाचण्या करणे यावर भर दिला जात असल्याची माहिती डॉ. जाधव यांनी दिली.

प्रतिबंधित क्षेत्रे-९

प्रतिबंधित विभागातील घरे- २२ हजार

प्रतिबंधित विभागातील लोकसंख्या- १ लाख १४ हजार

प्रतिबंधित इमारती- २०३

प्रतिबंधित इमारतीतील लोकसंख्या- ७५ हजार

प्रतिबंधित मजले- ४,२३१

प्रतिबंधित मजल्यांवरील लोकसंख्या- ६ लाख ५९ हजार