‘ग्लोबल सिटीझन इंडिया’ची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुहूर्तमेढ

‘ग्लोबल सिटिझन’ या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘कोल्डप्ले’ बँड मुंबईत येणार असून त्याची तिकिटे मिळवण्यासाठी तरुणांना प्रत्यक्ष समाजकार्य करावे लागणार आहे. ‘सोशल करन्सी’ (सामाजिक चलन) कमवा आणि तिकिटे जिंका, अशी अनोखी संकल्पना राबवणाऱ्या ‘ग्लोबल सिटिझन’ने भारतात आपल्या सामाजिक उपक्रमांची मुहूर्तमेढ केली आहे. प्रसिद्ध गायक-वादक क्रिस मार्टिनचा ब्रिटिश बँड ‘कोल्डप्ले’ १९ नोव्हेंबरला मुंबईत आपला पहिला कार्यक्रम सादर करण्यासाठी सज्ज झाला आहे. या कार्यक्रमासाठी बँडच्या चाहत्यांना महागडी तिकीटे खरेदी करून खिसा रिकामा करावा लागणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले असले तरी ही तिकीटे सहजासहजी त्यांच्या पदरात पडणार नाहीत.

भारतात सामाजिक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने पंधरा वर्षांचा ठोस कार्यक्रम हाती घेऊन संस्थेने ‘ग्लोबल एज्युकेशन अँड लीडरशिप फाऊंडेशन’ या भारतीय सामाजिक संस्थेच्या मदतीने ‘ग्लोबल सिटिझन इंडिया’ ही मोहीम सुरू केली आहे. मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

या वर्षी १९ नोव्हेंबरला मुंबईत पहिल्यांदाच वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर हा फेस्टिव्हल रंगणार आहे. ‘कोल्डप्ले’ बँडचा प्रमुख सूत्रधार क्रिस मार्टिन गेली अनेक वर्षे या संस्थेचे प्रतिनिधित्व करत असून भारतात होणाऱ्या या महोत्सवासासाठी तो खास लाइव्ह शो करणार आहे. ‘कोल्डप्ले’बरोबरच अमेरिकन रॅपर जे झे ही या महोत्सवात सामील होणार असून बॉलीवूड सिताऱ्यांचाही यात महत्त्वाचा सहभाग असणार आहे.

संगीतकार ए. आर. रेहमान, शंकर-एहसान-लॉय, गायक अरिजीत सिंग यांच्याबरोबर आमिर खान, अमिताभ बच्चन, फरहान अख्तर, कतरिना कैफ, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, करिना कपूर-खान, दिया मिर्झा अशी भलीमोठी स्टारमंडळीही या महोत्सवात आणि मोहिमेत सक्रिय सहभागी होणार आहेत. दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी-स्वच्छता या तीन मुद्दय़ांवर ‘ग्लोबल सिटिझन इंडिया’ काम करणार असून त्या त्या क्षेत्रात कार्यशील असलेले बॉलीवूड कलाकार या मोहिमेशी जोडले गेले आहेत.

मी स्वत: क्षयरोगातून पूर्ण बरा झालो आहे – अमिताभ बच्चन

सामाजिक कार्य करा आणि ‘सोशल करन्सी’ वाढवा, हा संदेश देणाऱ्या या मोहिमेत सहभागी होताना आपण फार पूर्वीच वेगवेगळ्या सामाजिक योजनांमध्ये सक्रिय सहभागी आहोत, असे अमिताभ बच्चन यांनी सांगितले. सामाजिक बदलांचा चेहरा आपण असले पाहिजे, हे अध्याहृत करताना आपण स्वत: क्षयरोग, हेप्पेटायटीस बीसारख्या रोगांचे शिकार होतो. त्यातून पूर्ण बरे झाल्यानंतर अन्य कोणीही अशा आजारांना बळी पडू नये, यासाठी संबंधित सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी झाल्याचे बच्चन यांनी स्पष्ट केले.

मुलींना कमी लेखणारी मानसिकता आता तरी बदलायला हवी – करीना कपूर खान

गर्भवती असतानाही अभिनेत्री म्हणून काम करताना मला अजूनही तुला मुलगा होणार की मुलगी? किंवा अरे तू आई होणार म्हणजे तुला तुझ्या कारकिर्दीवर पाणी सोडावे लागणार, असले प्रश्न विचारले जातात. मुलींना कमी लेखणारी ही मानसिकता आता तरी बदलायला हवी. स्वतंत्रपणे एक जीव आपल्या पोटात वाढवण्याची क्षमता असलेली स्त्री कुठल्याही गोष्टीत मागे नाही, हे लोकांवर बिंबवण्यासाठी ‘ग्लोबल सिटिझन इंडिया’चा भाग होणार असल्याचे करीनाने स्पष्ट केले.