मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षेतील (सीईटी) पन्नास टक्के गुण तर बारावीचे पन्नास टक्के गुण ग्राह्य धरताना विविध मंडळाच्या विद्यार्थ्यांचे गुण एकाच पातळीवर मोजण्याचे (प्रसामान्यीकरण) आव्हान प्रवेश नियमन प्राधिकरणासमोर निर्माण होणार आहे.
राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षेबरोबरच बारावीचे गुण गृहित धरण्याचा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी जाहीर केला. मात्र, त्यामुळे विविध मंडळाच्या विद्यार्थ्यांना मिळालेले गुण एकसमान पातळीवर कसे ग्राह्य धरणार असा वर्षांनुवर्षे वादग्रस्त असलेला प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिकांसाठी महाविद्यालयांकडून दिले जाणारे भरघोस गुण, अतिरिक्त गुणांमुळे वाढलेले निकाल यांमुळे गुणवत्ता राखली जाणार का असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
अडचण काय? : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाबरोबर (राज्यमंडळ) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीआयएससीई) यांसह आंतरराष्ट्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्याचबरोबर इतर राज्यातील विद्यार्थीही राज्यातील प्रवेश परीक्षा देऊन येथील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. या प्रत्येक मंडळाच्या अभ्यासक्रमाचा मूळ आराखडा सारखा असला तरी त्याची काठीण्य पातळी वेगवेगळी आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक परीक्षेसाठीची मूल्यमापन प्रणाली वेगवेगळी आहे. त्यामुळे दोन वेगळय़ा मंडळाच्या विद्यार्थ्यांना सारखेच गुण मिळाले असले तरी ते एकसमान ग्राह्य धरता येत नाहीत. त्यासाठी गुणांचे प्रसामान्यीकरण (नॉर्मलायझेशन) करण्यात येते. मात्र, त्याबाबतही अनेक वाद आहेत.
पुन्हा वाद? : यापूर्वीही बारावीचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावरून सातत्याने वादही झाले. राज्यमंडळापेक्षा इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याचे आक्षेप सातत्याने घेण्यात आले. त्याचप्रमाणे आता बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर त्याचे गुण विचारात घेतल्यास विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शिक्षण धोरणात मंडळाच्या परीक्षांचे (दहावी, बारावी) महत्व कमी करण्याची सूचना देण्यात आली आहे. मात्र बारावीचे गुण ग्राह्य धरल्यास पुन्हा एकदा मंडळाच्या परीक्षांचे महत्व वाढेल.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी फारकत
देशपातळीवर आणि इतर राज्यातही बारावीचे गुण ग्राह्य धरण्यावरून यापूर्वीही वाद झाला होता. जेईई मुख्य परीक्षा आणि बारावीचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने २०१६ मध्ये रद्द केला होता. त्यामुळे राज्याने आता पुन्हा एकदा बारावीचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतल्यास तो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी फारकत घेणारा ठरण्याची शक्यता आहे.