‘मेट्रो-३’ प्रकल्पासाठी आरे वसाहतीमध्ये उभारण्यात येणाऱ्या कारशेडसाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षांची कत्तल करण्यात येणार असून पर्यावरणप्रेमींनी रविवारी आरे वसाहतीमधील पिकनिक पॉइंट येथे मानवी साखळी करून कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या वृक्ष कत्तलीविरोधात आंदोलन केले.

त्याच वेळी आझाद मैदान येथेही ‘आरे बचाव’साठी आंदोलन करण्यात आले. पालिकेने वृक्ष कत्तलीसाठी परवानगी पत्र दिल्यानंतर पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनाची धार वाढू लागली आहे. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने ‘मेट्रो-३’च्या कारशेडसाठी आरे वसाहतीमधील २,६४८ झाडांची कत्तल करण्यास मंजुरी दिली असून, त्यानंतर पर्यावरणप्रेमींनी ‘आरे बचाव’ मोहीम उघडून आंदोलनाचा सपाटा लावला आहे. कारशेडच्या विरोधात ‘आरे कंझव्‍‌र्हेशन’ नावाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर २०१५ पासून पर्यावरणप्रेमी एकत्र आले आहेत. त्याच वेळी काही संस्था आणि व्यक्तींनी कारशेडच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

गेल्या १५ दिवसांपासून विविध ठिकाणी ‘आरे बचाव’ आंदोलन सुरू आहे. काही संस्था, संघटना आणि तरुणांनी रविवारी आरे वसाहतीमधील पिकनिक पॉइंट येथे सुमारे दोन हजार पर्यावरणप्रेमींनी कारशेडच्या विरोधात मानवी साखळीद्वारे निषेध केला. त्याच वेळी आझाद मैदानातही काही नागरिकांनी एकत्र येऊन कारशेडच्या विरोधात आंदोलन केले.

वांद्रे येथील हिल रोडवरील सेंट पिटर चर्चमध्ये ‘आरे बचावा’साठी व्यापक प्रमाणावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी झाले होते.