हम्बोल्ट पेंग्विन पाहणारे पहिले मुंबईकर
मुंबईत आणलेले पेंग्विन कधी बघायला मिळणार अशी उत्सुकता तमाम मुंबईकरांना असतानाच शहरातील विद्यार्थ्यांना थेट पालिका आयुक्तांकडून पेंग्विन पाहण्याचे निमंत्रण मिळते आणि त्यांचा रविवार पेंग्विन दर्शनाने सुखकर होतो. देवांगी सेठ आणि आदित्य व्यास असे या दोन विद्यार्थ्यांचे नाव असून त्यांच्या जिज्ञासू वृत्तीमुळे त्यांना सर्वप्रथम पेंग्विन पाहण्याची ही संधी मिळाली आहे.
पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात आणण्यात आलेले पेंग्विन हे अंटाक्र्टिकामधील अतिथंड प्रदेशातील असून ते मुंबईच्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांना परत पाठवावे अशी मागणी करणारे पत्र कांदिवलीच्या ठाकूर संकुलातील आशा नगर चिल्ड्रेन्स अकादमीमध्ये इयत्ता चौथीत शिकणाऱ्या देवांगी सेठ, सांताक्रूझ येथील पोद्दार माध्यमिक विद्यालयात पाचवीत शिकणारी शरण्या शुभ्रांशू आणि मालाड येथील व्हिबग्योर माध्यमिक विद्यलयातील इयता दुसरीत शिकणारा आदित्य व्यास या तीन विद्यार्थ्यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहून केली होती.
या पत्राची तातडीने दखल घेत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना या तीन विद्यार्थ्यांना पाकिलेच्या प्राणिसंग्रहालयात आणण्यात आलेले हम्बोल्ट पेंग्विन आणि अंर्टाक्र्टिकामधील पेंग्विन यांच्यातील फरक समजावून सांगण्याचे निर्देश दिले. त्यानुसार या विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यात आला आणि पेंग्विन पाहण्यासाठी थेट आयुक्तांचे निमंत्रण पाठवण्यात आले.
या सर्वानी विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत विलगीकरण कक्षात असलेल्या हम्बोल्ट पेंग्विन पक्ष्यांची काचेतून पाहणी केली. या वेळी अधिकाऱ्यांनी पेंग्विनमधील फरक विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. दरम्यान, आयुक्तांनी निमंत्रित केलेली शरण्या शुभ्रांशू ही विद्यार्थिनी काही कारणामुळे उपस्थित राहू शकली नाही.
जगभरातील अंदाजे १२० प्राणिसंग्रहालयात हम्बोल्ट पेंग्विन पक्षी असून आशिया खंडातही १६ प्राणिसंग्रहालयात हम्बोल्ट पेंग्विन पक्षी आहेत, ही बाब प्रामुख्याने या छोटय़ा पाहुण्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यानंतर मात्र या विद्यार्थ्यांनी हम्बोल्ट पेंग्विन पक्षी हे भारतीय हवामानाशी जुळवून घेऊ शकत नसल्याचा गैरसमज दूर झाल्याची भावना व्यक्त केली.