मुंबई : क्रुझ अमलीपदार्थ पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे अधिकारी (एनसीबी) समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या खंडणीच्या आरोपाशी आपला काहीही संबंध नाही. शिवाय आपण एनसीबी वा एनसीबीच्या कुठल्याही अधिकाऱ्यावर आरोप केलेले नाहीत, असा दावा याप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनच्यावतीने मंगळवारी उच्च न्यायालयात करण्यात आला.

आतापर्यंत राजकीय नेत्याच्या जावयाला अटक केल्याचा सूड म्हणून तपासावर प्रश्न उपस्थित केले जात असल्याचा आरोप एनसीबीने केला होता. साईल प्रकरणानंतर मात्र या सगळय़ाचे खापर आर्यनच्या माथी फोडण्यात येत असल्याचा आरोपही आर्यनच्यावतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहटगी यांनी केला.  आर्यनकडे अमलीपदार्थ मिळालेले नाहीत. तसेच अमलीपदार्थाचे सेवन केले की नाही याची शहानिशा करणारी त्याची वैद्यकीय चाचणीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचेही रोहटगी यांनी  सांगण्याचा प्रयत्न केला.

कायदाही सुधारण्याची संधी देतो

कमी प्रमाणात अमलीपदार्थाचे सेवन केल्यास आरोपीला सुधारण्याची संधी देण्याचे कायद्याने स्पष्ट केले आहे. शिवाय आरोपी तरुण असल्यास त्याला पीडित म्हणून वागणूक देण्याचेही कायद्यात म्हटले आहेत. आर्यन हा २३ वर्षांचा असून त्याला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. शिवाय त्याच्याकडे अमलीपदार्थही सापडलेले नाहीत किंवा त्याचे सेवनही केलेले नाही. त्याचा कटात सहभाग असल्याचे दाखवणारा पुरावाही नाही. त्यामुळे दुसऱ्याकडे अमलीपदार्थ सापडल्याची शिक्षा त्याला दिली जाऊ नये. किंबहुना त्याला सुधारण्याची संधी द्यायला हवी, असेही रोहटगी यांनी न्यायालयाला सांगितले.