जागेचा ताबा सीसीआयला देण्याचे लघुवाद न्यायालयाचे आदेश; गेल्या अनेक वर्षांपासून जागेचा वाद 

मुंबई : चर्चगेट येथील प्रसिद्ध ‘के. रुस्तुम’ या आइस्क्रीम पार्लरचे मालक के. रुस्तम अ‍ॅण्ड कंपनीला ब्रेबॉर्न स्टेडियममधील दुकानाच्या जागेचा ताबा क्रिकेट क्लब ऑफ इंडियाला (सीसीआय) दोन महिन्यांत देण्याचे आदेश लघुवाद न्यायालयाने दिले आहेत.

सीसीआयला विविध उपक्रमांसाठी या मालमत्तेची गरज आहे आणि रुस्तुम हे या मालमत्तेवर कोणताही व्यवसाय करत नाही, असा दावा करून सीसीआयने दुकानाची जागा उपलब्ध करण्याची मागणी केली होती. महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्यांतर्गत सीसीआयने दावा दाखल करून ही मागणी केली होती. लघुवाद न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. तोडकर यांनी सीसीआयच्या बाजूने निर्णय देऊन दुकानाच्या जागेचा ताबा दोन महिन्यांत सीसीआयकडे देण्याचे आदेश के. रुस्तम अ‍ॅण्ड कंपनीला दिले आहेत.

कंपनीकडून ५२७ रुपये दराने मासिक भाडे दिले जात असून ते प्रमाणित भाडय़ापेक्षा खूपच कमी आहे, असा दावा सीसीआयने दाव्यात केला होता. ज्या उद्देशासाठी कंपनीला जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करण्यात आली होती त्या जागेचा एक महत्त्वपूर्ण भाग कंपनीकडून गेल्या तीन-चार वर्षांपासून वापरलाच जात नसल्याचेही सीसीआयने म्हटले होते. दुकानाची जागा रिकामी करण्यास नकार देण्यात आल्यास आम्हाला नुकसान सहन करावे लागेल, असा दावाही सीसीआयने केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनीतर्फे सीसीआयच्या दाव्याला विरोध केला होता. तसेच दुसऱ्या महायुद्धापूर्वी ही जागा विनामूल्य उपलब्ध होती, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. जागा सीसीआयच्या ताब्यात देण्याचे आदेश देण्यात आल्यास आपल्याला व्यवसाय करण्यासाठी दुसरी जागा उपलब्ध नसल्याचा दावाही कंपनीतर्फे करण्यात आला होता. न्यायालयाने मात्र सीसीआयचे म्हणणे मान्य केले. तसेच गेली १६ वर्षे चाललेल्या या दाव्याचा निकाल देताना न्यायालयाने सीसीआयच्या बाजूने निर्णय दिला.