देवेंद्र फडणीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टरमाइंड आहेत, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. मलिकांच्या या आरोपामुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपा नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत मलिकांवर टीका सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांनी देखील नवाब मलिकांना उद्देशून एक मोठं विधान केलं आहे.

“राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. या आरोपात एक टक्का पण तथ्य असल्यास मी राजकीय व सामाजिक जीवनातून संन्यास घेईन. तथ्य नसल्यास नवाब मलिक यांनी देवेद्र फडणवीस यांच्या कुटुंबाची माफी मागावी.” असे मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे.

तसेच, “नवाब मलिक महाष्ट्रातील जनतेची दिशाभुल करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी तसेच नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या कुटुंबावर जे आरोप केले आहेत, ते अतिशय निंदनीय असुन त्यात तत्थ्य नाही. महाराष्ट्रातील १० करोड जनतेला देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर खूप विश्वास व अभिमान आहे. महाराष्ट्र भ्रष्ट्राचार व अत्याचाराने झोडपला गेला आहे याकडे दुर्लक्ष करून मंत्री नवाब मलिक दुसऱ्यावर आरोप करण्यात आपला वेळ घालवत आहे.” असा आरोप देखील मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्जच्या उलाढालींचे मास्टर माइंड; नवाब मलिक यांचे गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रग्ज प्रकरणातील सहभागाचा सीबीआय आणि इतर केंद्रीय मंत्री संस्थांच्या माध्यमातून तपास केला जावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केलीय. तसेच फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंची बदली केली असा आरोप नवाब मलिक यांनी केलाय.