प्रसाद रावकर

तीन हजार इमारती, आस्थापनांचे अग्निप्रतिबंधक उपायांकडे दुर्लक्ष; २७ जणांविरोधात न्यायालयात खटला दाखल करणार

मुंबईतील उंच इमारतींमध्ये आग लागून जीवितहानी होण्याच्या घटना वारंवार घडत असतानाही शहरातील टोलेजंग इमारती आणि आस्थापनांची आगीबाबत बेपर्वाई कायम आहे. अग्निप्रतिबंधक यंत्रणेचा अभाव असलेल्या किंवा त्यात त्रुटी असलेल्या साडेतीन हजार निवासी इमारती आणि व्यावसायिक आस्थापनांपैकी अवघ्या ५३२ इमारतींनीच ही यंत्रणा अद्ययावत करण्याचे गांभीर्य दाखवले आहे. उर्वरित तीन हजार इमारतींनी पालिकेची सूचना धाब्यावर बसवली आहे. यातल्या २७ जणांविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्याची तयारी अग्निशमन दलाने सुरू केली आहे.

रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी बहुमजली इमारतींमध्ये अग्निप्रतिबंध यंत्रणा बसविणे सक्तीचे आहे. मात्र, अनेक ठिकाणी त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचे आगीच्या काही दुर्घटनांनंतर उजेडात आले आहे. इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या अग्निप्रतिबंध यंत्रणेची अग्निशमन दलाकडून तपासणी केली जाते. तपासणीअंती यंत्रणेतील त्रुटी सुधारण्याची सूचना करण्यात येते.  तसेच महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीवनरक्षक उपाय कायद्यातील तरतुदीनुसार भविष्यात दर सहा महिन्यांनी इमारतीमधील अग्निप्रतिबंध यंत्रणेची संबंधित परवानाधारक संस्थेकडून तपासणी करून त्याबाबतचे प्रमाणपत्र अग्निशमन दलाला सादर करणे बंधनकारक करण्यात आहे. मात्र बहुतांश सोसायटय़ा, हॉटेल्स, मॉल्स, विविध आस्थापना याकडे कानाडोळा करीत असतात. त्यामुळे आग लागल्यानंतर इमारतीमधील सदोष अग्निप्रतिबंध यंत्रणेचा उपयोग होत नाही. परिणामी, आगीची तीव्रता वाढून जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होते, असे अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

सदोष अग्निप्रतिबंध यंत्रणेत सुधारणा करण्याकडे कानाडोळा करणाऱ्या २७ जणांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्याची तयारी अग्निशमन दलाने केली आहे. अग्निशमन दलाने याबाबतची तपशीलवार माहिती पालिकेच्या विधि खात्याकडे पाठविली असून लवकरच या २७ जणांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. त्याचबरोबर सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या काही इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात यावी, असे पालिका आणि वीजपुरवठा कंपनीला कळविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

अवघ्या ५३२ जणांचा प्रतिसाद

* अग्निशमन दलाने २०१५ ते मार्च २०१९ या काळात मुंबईमधील तब्बल पाच हजार २३१ इमारतींमधील अग्निप्रतिबंध यंत्रणेची तपासणी केली.

* ऑगस्ट २०१८ ते मार्च २०१९ या काळात ९२२ इमारती आणि एक हजार ५९८ आस्थापनांची तपासणी केली.

* या सात हजार ७५१ ठिकाणी तपासणी केल्यानंतर त्यापैकी तीन हजार ४०० ठिकाणच्या अग्निप्रतिबंध यंत्रणेत त्रुटी असल्याचे आढळून आले.

* या सगळ्यांना यंत्रणेत सुधारणा करण्याची आणि त्याबाबतची माहिती देण्याची सूचना अग्निशमन दलाकडून करण्यात आली.

* आतापर्यंत तीन हजार ४०० पैकी केवळ ५३२ जणांनीच यंत्रणेत सुधारणा करून त्याची माहिती अग्निशमन दलाला दिली.

अग्निप्रतिबंध यंत्रणेतील त्रुटी दूर करून त्याची माहिती अग्निशमन दलाला देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. अग्निसुरक्षेबाबत नागरिकांनी तत्पर राहायला हवे.

– प्रभात रहांगदळे, प्रमुख अग्निशमन अधिकारी