शेतकरी आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याने उत्तर भारतातून देशभरात होणारा औषधांचा पुरवठा खंडित झाला असून भविष्यात अशीच स्थिती राहिल्यास औषधांचा तुडवडा भासण्याचा धोका असल्याची चिंता व्यक्त करत यावर तोडगा काढण्याची मागणी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अण्ड ड्रगिस्टने (एआयओसीडी) पत्राद्वारे पंतप्रधानांना केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील बहुतांश कंपन्यांचे उत्पादन हे हरियाणा, हिमाचल प्रदेश इत्यादी उत्तरेकडील राज्यांमध्ये होत असून येथून पुरवठा देशभरात केला जातो. परंतु शेतकरी आंदोलन सुरू झाल्यापासून वाहतूक ठप्प झाल्याने येथून होणारा पुरवठाही गेल्या काही दिवसांपासून बंद झाला आहे. पुरवठा सुरळीत न झाल्यास औषधांचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा औषधपुरवठा साखळीवर परिणाम होणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत, असे पत्रात संघटनेने नमूद केले आहे. तसेच औषध ही जीवनावश्यक वस्तू असून याच्या पुरवठय़ावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही संघटनेने आंदोलकांना केले आहे.

देशभरात लागणाऱ्या औषधांच्या १८ टक्के हिस्सा हा महाराष्ट्रात लागतो. यातील जवळपास ७० ते ७५ टक्के औषधांचा पुरवठा पंजाब, हिमाचल प्रदेश या उत्तरेकडील राज्यामधून केला जातो. येथे औषधांची मोठी गोदामेदेखील आहेत. सध्या हा पुरवठा बंद आहे. औषध कंपन्या आगाऊ महिनाभराचा साठा करून ठेवतात. त्यामुळे १५ दिवस तरी तुटवडा भासण्याची शक्यता नाही. परंतु पुरवठा पूर्ववत न झाल्यास मात्र देशभरात सर्वत्रच औषधांचा ७० ते ७५ टक्के तुटवडा निर्माण होऊ शकतो. या अनुषंगाने खबरदारी म्हणून आधीच सरकारला सावध केले असल्याचे एआयओसीडीचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले.

आंदोलनाला जातीय, प्रांतीय रंग देण्याचा प्रयत्न -शेट्टी

सांगली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला केंद्र शासनाकडून जातीय व प्रांतीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते  राजू शेट्टी यांनी  केला. ८ डिसेंबरचा भारत बंद ताकदीने पाळण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेले ११ दिवस पंजाबमधील शेतकरी दिल्लीत आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या वतीने ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली असून आमची संघटना या  आंदोलनामध्ये सहभागी होत आहे.  भारत बंद आंदोलनामध्ये सहभागी होऊन शेतकरी आपला शेतीमाल या दिवशी विकणार नाहीत. एक दिवस अन्नदात्यासाठी म्हणून सर्वानी आपले व्यवहार बंद ठेवून शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहनही शेट्टी यांनी केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Impact on medicine supply due to farmers agitation abn
First published on: 07-12-2020 at 00:12 IST