येत्या २४ तासांत राज्यात मान्सून आणखी सक्रिय होणार असून पुढील चार-पाच दिवसांत राज्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर कोकणसह मुंबई आणि परिसरात येत्या चार दिवसांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुणे येथील हवामान खात्याचे अधिकारी अनुपम कश्यपी यांनी ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कश्यपी यांच्या माहितीनुसार, येत्या चार-पाच दिवसांत राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज आहे. खासकरुन उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातही मान्सून चांगला सक्रिय होणार असून कोकण आणि गोव्यात येत्या पाच दिवसांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण आणि गोव्यात पहिल्यापासूनच चांगला पाऊस सुरु आहे. त्यानंतर आता पुढील चार पाच दिवसांत या भागात सर्वदूर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. म्हणजेच येथील सुमारे ७६ टक्क्यांपेक्षा अधिक भागात मुसळधार पाऊस होईल. मध्य महाराष्ट्रातही सर्वदूर चांगला पाऊस होण्याची शक्यता यामध्ये ५२ ते ७६ टक्के पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भातही पुढील दोन-तीन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तर कोकण आणि कोकणात त्याचबरोबर मुंबई आणि परिसरात पुढील चार दिवसांसाठी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पहिल्या चार दिवसांत काही भागात २० सेमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात ३ जुलैला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In coming 4 5 days monsoon will be vigorous in maharashtra says imd aau
First published on: 01-07-2019 at 19:10 IST