मुंबई : महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) केलेल्या कारवाईत चीनवरून आलेल्या १६० टन निकृष्ट दर्जाची खेळणी व बनावट सौंदर्य प्रसाधने जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत साडेसहा कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

मुंबई डीआरआयला गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे मुंद्रा पोर्ट, हझिरा पोर्ट, कांडला एसईझेड आणि आयसीडी पियाला (फरीदाबाद) येथे १० कंटेनर अडवण्यात आले. त्यात कर चुकवून आणलेली खेळणी, बनावट सौंदर्य प्रसाधने व बुटांचा समावेश होता. त्यांना शोभेची खोटी झाडे, किचेन व शोभेच्या वस्तू घोषित करून आणण्यात आले होते. ही आयात नियमानुसार झाली नसून त्यातील वस्तू निकृष्ट दर्जाच्या आहेत. तसेच खेळण्याच्या आयातीसाठी आवश्यक असलेले बीआयएस प्रमाणपत्रही त्यांनी मिळवले नव्हते. त्यामुळे विदेशी व्यापार धोरण २०२० याचे उल्लंघन असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. बीआयएस प्रमाणपत्र नसताना खेळण्याची आयात करणे प्रतिबंधित आहे. त्या वस्तू आयात करणाऱ्या व्यापाऱ्याच्या खर्चावर निर्यात करणाऱ्या देशात परत पाठवल्या जातात अथवा त्या नष्ट केल्या जातात.

याशिवाय या कारवाईत बनावट सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्यासाठीही आवश्यक प्रमाणपत्रे घेण्यात आली नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच बुटही जप्त करण्यात आले. भारत सरकारच्या खेळणी आयात धोरणानुसार डीआरआयने चिनी खेळण्यांच्या तस्करीविरोधात आणखी कडक कारवाई सुरू केली आहे. अशी खेळणी मुलांसाठी धोकादायक ठरतात. तसेच अशा निकृष्ट दर्जाच्या वस्तूंमुळे स्थानिक वस्तूंच्या विक्रीवरही परिणाम होतो. तसेच सराकारला मोठ्या प्रमाणात महसुली तोटा सहन करावा लागतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहा कंटेनर अडवले

चार महिन्यांपासून डीआरआय अशा खेळण्यांच्या तस्करीबाबत तपास करत आहे. त्यांच्या पडताळणीत १० संशयीत कंटेरनरमधून चीनी वस्तू येत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर मुंद्रा पोर्ट, हझिरा पोर्ट, कांडला एसईझेड आणि आयसीडी पियाला (फरीदाबाद)येथे सापळा रचून १० कंटेनर अडवण्यात आले. त्यात चीनी खेळणी व बनावट सौंदर्य प्रसाधने सापडली.