युद्धग्रस्त येमेनच्या जेट्टीवर बंदूकधारी बंडखोर पोहोचल्यानंतरही स्वत:च्या प्राणांची बाजी लावून तब्बल १६०० जणांची सुटका करत अतुलनीय शौर्य दाखविणाऱ्या इंदर सिंग ओझा, सत्य रंजन मंडल आणि केशरसिंग चौधरी अशा तीन नौसैनिकांना बुधवारी युद्ध सेवा पदक देऊन गौरविण्यात आले.
युद्धग्रस्त येमेनमधील तब्बल तीन हजार नागरिकांची सुटका करणारी ‘ऑपरेशन राहत’ ही मोहीम गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात भारतीय नौदलाने यशस्वीरीत्या पार पाडली. त्याबद्दल भारतीय नौदलावर जगभरातून स्तुतिसुमनांचा वर्षांव झाला. त्यातील नौसैनिकांनाही युद्ध सेवा पदक प्रदान करण्याचा एक दुर्मीळ योग बुधवारी जुळून आला. त्यांनी लावलेली प्राणांची बाजी हा त्यासाठीचा एकमात्र निकष होता. इंदर सिंग ओझा यांनी स्वत: या मोहिमेचे नेतृत्व करून १६२८ जणांना सुटका करून ‘आयएनएस सुमित्रा’वर यशस्वीरीत्या आणले एवढेच नव्हे तर संपूर्ण प्रवासात त्यांची काळजीही घेतली. ही मोहीम सुरू असताना येमेनच्या बंदरावर तुफान गोळीबार सुरू होता. त्याची पर्वा न करता त्यांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल त्यांना हे पदक जाहीर झाले. याच ‘ऑपरेशन राहत’साठी ‘आयएनएस मुंबई’ ही युद्धनौका किनाऱ्याजवळ पोहोचली तेव्हा बंडखोरांनी जेट्टीचा ताबा घेऊन अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली, त्या वेळेस मदतीस आलेलेही अनेक जण मागे हटले. त्या परिस्थितीत गोळीबार होत असताना प्राणांची बाजी लावत अक्षरश: रांगत जाऊन अडकलेल्या ४८६ जणांची सुटका करण्याच्या दाखविलेल्या शौर्याबद्दल मंडल यांना गौरविण्यात आले.
सुटका केलेल्या व्यक्तींना ‘आयएनएस तर्कश’च्या दिशेने घेऊन जाताना त्यात एक स्थानिक बंडखोर एके ४७ घेऊन घुसल्याचे लक्षात आल्यानंतर केशरसिंग चौधरी यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून त्या नौकेत उडी घातली आणि त्या बंडखोराला शस्त्र खाली ठेवण्यास भाग पाडून सर्वाचे प्राण वाचवले या शौर्याबद्दल त्यांनाही युद्ध सेवा पदक बुधवारी प्रदान करण्यात आले. युद्ध सेवा पदक विजेत्यांमध्ये याशिवाय रिअर अ‍ॅडमिरल बी. दासगुप्ता, कॅप्टन आलोक आनंद यांचाही समावेश होता. तर आयएनएस मुंबईचे कॅप्टन राजेश धनकर, आयएनएस तर्कशचे कॅप्टन प्रदीप सिंग यांना नौसेना पदक देऊन गौरविण्यात आले.
हेलिकॉप्टर वैमानिक कमांडर संजय शुक्ला, पाणबुडे असलेले अनिल कुमार व थोंगबाम प्रकाश सिंग यांना नौसेना शौर्य पदक देऊन गौरविण्यात आले.
तुफान पावसात बुडणाऱ्या जहाजातून त्यांनी १९ जणांची यशस्वी सुटका केली. याशिवाय कमांडर अशोक कुमार (नौसेना पदक- शौर्य), कमांडर बिनू कुमार भास्करन, लेफ्टनंट कमांडर एचकेएस चौहान यांचाही पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश होता.