लांब पल्ल्याच्या ‘बराक ८’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
अरबी समुद्रातील त्या क्षणाकडे सर्वच युद्धतज्ज्ञांचे डोळे लागून राहिले होते. अखेरीस तो क्षण आला.. एक क्षेपणास्त्र भारतीय युद्धनौकेच्या दिशेने झेपावले, दुसऱ्याच सेकंदाला त्याची तात्काळ वर्दी भारतीय नौदलाची अद्ययावत स्टेल्थ फ्रि गेट असलेल्या ‘आयएनएस कोलकाता’वरील यंत्रणेला मिळाली आणि त्यानंतर क्षणार्धात ‘बराक ८’ हे क्षेपणास्त्र आकाशात झेपावलेही.. त्यानंतरच्या अवघ्या काही सेकंदांमध्येच ‘बराक८’ ने लक्ष्यभेद केला. या यशामुळे भारतीय नौदलाने आता अशा प्रकारे हवाई लक्ष्यभेद करण्याची क्षमता राखणाऱ्या मोजक्याच देशांच्या मांदियाळीमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
भारत आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या ‘बराक ८’ या क्षेपणास्त्राची चाचणी बुधवारी अरबी समुद्रात घेण्यात आली. अचूक लक्ष्यभेद करून ही चाचणी यशस्वी झाल्याने भारतीय नौदलाच्या भात्यात आता आणखी एक महत्त्वाचे शस्त्र दाखल झाले आहे. चाचणीच्या यशस्वितेमुळे हवाई हल्ल्यांची कोणतीही भीती बाळगावी लागणार नाही, असा विश्वास संरक्षण दलातील सूत्रांनी व्यक्त केला. या चाचण्यांसाठी दुसऱ्या वेगवान आक्रमकाची निवड करण्यात आली होती. हवाई लक्ष्यभेदासाठी विकसित करण्यात आलेल्या यंत्रणेमध्ये बहुपयोगी व आक्रमणाचा तात्काळ इशारा देण्याची क्षमता असणाऱ्या रडार यंत्रणेचाही समावेश आहे. एकाच वेळेस येणाऱ्या सुमारे अडीचशे किलोमीटरच्या परिघातील अनेक आक्रमक शस्त्रास्त्रांची सूचना देण्याची क्षमता इस्रायली बनावटीच्या या नव्या रडार यंत्रणेमध्ये आहे.

‘बराक ८’ ची वैशिष्टय़े
* भारत-इस्रायल यांची संयुक्त निर्मिती
* ७० किमी लांबीचा पल्ला
* विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन्स व प्रोजेक्टाइल्स यांचा लक्ष्यभेद करण्याची क्षमता
* दिवसा व रात्रीही अचूक लक्ष्यभेद

येत्या काळात कोलकाता वर्गातील सर्वच स्टेल्थ फ्रिगेटस्वर बराक ८ क्षेपणास्त्र बसविण्यात येणार आहे . द्रोण, लढाऊ विमाने किंवा क्षेपणास्त्र हल्ला या सर्व प्रकारच्या हवाई हल्ल्यांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता हे क्षेपणास्त्र राखते.
– नौदलातील सूत्रांनी दिलेली माहिती.