मुंबई: शीना बोरा हत्येप्रकरणी गेल्या साडेसहा वर्षांहून अधिक काळ अटकेत असलेली प्रमुख आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिला बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या प्रकरणातील सहआरोपी आणि इंद्राणीचा दुसरा पती पीटर मुखर्जीला २०२० मध्ये उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. ती बाब  सर्वोच्च न्यायालयाने इंद्राणीला जामीन मंजूर करताना विचारात घेतली. यापूर्वी सीबीआयने इंद्राणीच्या जामिनाला विरोध केला होता. इंद्राणीने स्वत:च्याच मुलीच्या म्हणजेच शीनाच्या हत्येचा कट रचला आणि तिची हत्या केल्याचा सीबीआयचा आरोप आहे. इंद्राणीने अनेक वेळा जामिनासाठी अर्ज केला. मात्र सत्र आणि उच्च न्यायालयाकडून तिला दिलासा मिळाला नाही. उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने जामीन नाकारल्याच्या निर्णयाविरोधात इंद्राणीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर १८ फेब्रुवारीला न्यायालयाने इंद्राणीच्या याचिकेवर सीबीआयला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते.

पुढील १० वर्षांत हा खटला संपणार नाही. १८५ साक्षीदार तपासायचे आहेत. गेल्या दीड वर्षांत एकाही साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यात आलेली नाही. तसेच इतर आरोपी जामिनावर बाहेर आहेत. इंद्राणीलाही मानसिक आजार आहेत, असा दावा इंद्राणीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी केला होता. तसेच तिची जामिनावर सुटका करण्याची मागणी केली होती.

इंद्राणीचा चालक श्याम राय या प्रकरणी माफीचा साक्षीदार बनला आहे. त्याने दिलेल्या जबाबानुसार, २४ एप्रिल २०१२ मध्ये इंद्राणीने दुसरा पती संजीव खन्नाच्या साथीने शीनाची गाडीत गळा आवळून हत्या केली. शीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संजीव खन्नाने इंद्राणीची मदत केली होती. मृतदेह बॅगेत भरून तो गाडीत ठेवण्यात आला. गाडी काही काळ वरळीतील गॅरेजमध्ये ठेवण्यात आली. नंतर रायगड येथे मृतदेह फेकण्यात आला. याप्रकरणी इंद्राणीला मदत केल्याप्रकरणी सीबीआयने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती.

प्रकरण काय?

शीना बोराची २०१२ मध्ये हत्या झाली होती. परंतु हे हत्याकांड २०१५ मध्ये उघडकीस आले होते. इंद्राणीचा चालक श्याम राय याला पिस्तूल बाळगल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली. त्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना शीना बोरा हत्याकांड उघडकीस आले.

न्यायालयाचा आदेश.. इंद्राणीवर सुरू असलेल्या खटल्यात काही साक्षी नोंदवण्यात आल्या असल्या तरी खटला बराच काळ चालू शकतो. शिवाय हे संपूर्ण प्रकरण केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हा खटला लवकर संपणार नाही. प्रदीर्घ काळ तुरुंगात घालवल्यानंतर संशयित आरोपीला जामिनाचा हक्क असतो, असे आमचे मत आहे. त्यामुळे आम्ही इंद्राणीला सशर्त जामीन मंजूर करत असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले.