मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांक पाच वरून एका अज्ञात व्यक्तीने एक महिन्याच्या तान्ह्या मुलाचे अपहरण केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. अपहरण करण्यापूर्वी ही व्यक्ती दोन तासांहून अधिक काळ रेल्वेस्थानकात घुटमळत होती. हे तान्हे मूल त्याच्या आईला बिलगून झोपले होते. त्यामुळे त्याला काही करता आले नाही. पण झोपेत हे मूल आईपासून थोडे बाजूला झाले, तेव्हा अपहरणकर्त्यांने आपला डाव साधला असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येत आहे. ही महिला तिची तीन वर्षांची मुलगी आणि या तान्ह्या मुलासह फलाटावर झोपली होती. नवऱ्याशी झालेल्या भांडणामुळे आपण रेल्वे फलाटावर झोपण्यासाठी आलो असल्याचे तिने पोलिसांना सांगितल्याचे समजते.या प्रकरणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील फुटेजच्या सहाय्याने अपहरणकर्त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.