‘एके-४७’ या अत्याधुनिक व घातक शस्त्राचेच नव्हे तर नवी मुंबईच्या ‘मरीन सेंटर’ या संस्थेतर्फे ‘शिप सिक्युरिटी ऑफिसर’, ‘बेसिक सेफ्टी ट्रेनिंग’ अशा नावाने अनेक बोगस अभ्यासक्रम राबविले जात आहेत. इतकेच नव्हे तर मरीन सेंटरप्रमाणेच लॉयल्टी मरीन ट्रेनिंग सेंटर, मास्ट अशा वेगवेगळ्या नावाच्या संस्थाही देशी-परदेशी जहाजांवर काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना वेगवेगळ्या कोर्सेसच्या नावे प्रमाणपत्रे देत आहेत.
काऊंटर पायरसी कोर्स, प्रोफिशिअन्सी इन फायरआर्म ट्रेनिंग अशा वेगवेगळ्या नावाने ही प्रमाणपत्रे दिली जात आहेत. अशी एक संस्था मुंबईत अंधेरी येथे कार्यरत असल्याचाही संशय आहे. जहाजांवर काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना हेरून त्यांच्याकडून पैशाच्या मोबदल्यात ही प्रमाणपत्रे तयार करून दिली जातात. २००६पासून हे उद्योग संबंधित संस्थेमार्फत सुरू आहेत. मात्र, संस्थेविरोधात अद्याप कारवाई झालेली नाही. आमदार बच्चू कडू यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नवी मुंबईचे पोलिस आयुक्त प्रभात रंजन यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. अर्थात या संस्थेने या आधी दिलेल्या प्रमाणपत्रांचा वापर संबंधित व्यक्ती कशा प्रकारे करीत आहेत, याचाही मागोवा पोलिसांनी घ्यायला हवा, अशी मागणी कडू यांच्यासोबत या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे ‘प्रहार विद्यार्थी संघटने’चे अ‍ॅड. मनोज टेकाडे यांनी केला.