तब्बल २८ तास उलटून गेल्यानंतर दुर्घटनाग्रस्त ‘आयएनएस सिंधुरत्न’ ही पाणबुडी मुंबईच्या नौदल गोदीमध्ये खेचून आणण्यात गुरुवारी सकाळी १०च्या सुमारास नौदलाला यश आले. दुपारी अडीचच्या सुमारास पाणबुडीतील दुर्घटनाग्रस्त भागामध्ये दोन बेपत्ता नौसैनिकांचे मृतदेह सापडले. गुदमरल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय आहे. दरम्यान, आतापर्यंतच्या सर्वच पाणबुडय़ांच्या अपघाताची उच्चस्तरीय तपासणी व चौकशीचे आदेश नौदलाने दिले आहेत.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, लेफ्टनंट कमांडर कपिश मुनवाल आणि लेफ्टनंट मनोरंजन कुमार अशी मृत अधिकाऱ्यांची नावे आहेत. मात्र नौदलाने त्याला दुजोरा दिलेला नाही. दुर्घटना घडली तेव्हा एकूण ९४ अधिकारी व नौसैनिक पाणबुडीवर होते. त्यातील सात जणांना बुधवारी सकाळीच हेलिकॉप्टरने आयएनएस अश्विनी या रुग्णालयात आणण्यात आले होते. तर उर्वरित ८५ जणांना विविध युद्धनौकांवर सुखरूप हलविण्यात आले आणि सुमारे २५ नौसैनिकांनिशी आयएनएस सिंधुरत्न नौदल गोदीत दाखल झाली.
बुधवारच्या दुर्घटनेनंतर नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल डी. के. जोशी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. दरम्यान, ज्यांच्या अखत्यारित असलेल्या पश्चिम विभागीय मुख्यालयामध्ये या दुर्घटना घडल्या ते व्हाइस अ‍ॅडमिरल शेखर सिन्हा हेही राजीनामा देणार, अशी चर्चा बुधवारपासून सुरू आहे. व्हाइस अ‍ॅडमिरल सिन्हा यांना गुरुवारी सकाळी दिल्ली येथे पाचारण करण्यात आले. दुपारीच ते दिल्लीत पोहोचले. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांच्या राजीनाम्याबाबत काहीच कळू शकले नाही त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.