शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांच्या दडपशाहीमुळे असुरक्षित बनलेल्या शिवसेना-भाजपच्या नगरसेविकांची गंभीर दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी उद्धव यांनीच त्यांना गुरुवारी ‘मातोश्री’वर बोलावून घेतले आहे. भाजपनेही या हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून संबंधित नेत्यावर कारवाईची मागणी केली. ‘मातोश्री’च्या धसक्यामुळे शिवसेनेच्या ‘त्या’ नेत्याने आपल्या विभागातील कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बुधवारी रात्री बोलावली होती.
सार्वजनिक प्रसाधनगृहात मोबाइल क्रमांक लिहून ठेवल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे, कामात अडथळे निर्माण केल्यामुळे त्रस्त असलेल्या माजी महापौर शुभा राऊळ आणि रहिवाशांचा गृहप्रवेश अडविणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या स्टॉलला कडाडून विरोध केल्यामुळे फेसबुकवर धमकी मिळालेल्या भाजप नगरसेविका मनीषा चौधरी यांना उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ‘मातोश्री’वर बोलावले आहे. महिलांवर होणाऱ्या अन्यायाला शिवसेनेने वाचा फोडली आहे. आता युतीच्या नगरसेविकांना पक्षातील ज्येष्ठ नेतेच त्रास देत असल्यामुळे उद्धव ठाकरे प्रचंड संतापले आहेत. या प्रकरणाची त्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची शहानिशा झाल्यानंतर संबंधित नेत्यावर कडक कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी
व्यक्त केली.
युतीमधील या तीनच नव्हे तर मुंबईतील अनेक प्रभागांमधील नगरसेविकांच्या कार्यात अडथळे आणण्याचे प्रयत्न शिवसेनेचेच नगरसेवक करीत आहेत. शीतल म्हात्रे, शुभा राऊळ आणि मनीषा चौधरी यांनी अन्यायालाय वाचा फोडल्यामुळे इतरही नगरसेविका आपले गाऱ्हाणे घेऊन पुढे येण्याच्या तयारीत आहेत. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
दरम्यान, ‘मातोश्री’ने दखल घेतल्याचे समजताच या प्रकरणात गुंतलेल्या नेत्याने तातडीने आपल्या समर्थकांची बैठक बुधवारी रात्री बोलावली होती. त्यात भाजपा नगरसेविका मनीषा चौधरी यांनी विनाकारण आपनी तक्रार केली आहे असे स्पष्ट केले. त्यांनी आपली माफी मागगितली नाही तर लोकसभा निवडणुकीत भाजपाला मदत करणार नसल्याचा इशारा आपल्या समर्थकांकडून दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Insecure women corporator of shiv sena to meet uddhav thackeray
First published on: 09-01-2014 at 02:20 IST