मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गावर ‘‘इंटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम’’ (आयटीएमएस) बसविण्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) मुहूर्त सापडला असून यासंबंधीचे कार्यादेश संबंधित कंपनीला देण्यात आले आहेत. महामार्गावर नऊ महिन्यांमध्ये यंत्रणा बसविण्यात येणार असून त्यानंतर महिनाभर या यंत्रणेची चाचणी घेण्यात येणार आहे. एकूणच वर्षभरात अत्याधुनिक अशी ‘आयटीएमएस’ यंत्रणा कार्यान्वित होऊन वाहतुकीला शिस्त लागेल, असा विश्वास एमएसआरडीसीकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून ९४ किमी लांबीच्या या द्रुतगती मार्गावरून दररोज अंदाजे ६० हजार वाहने धावतात. या मार्गासाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली असून नियमही घालण्यात आले आहेत. मात्र वाहनचालकांकडून वेगमर्यादा आणि नियमांचे पालन होत नाही. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी सज्ज यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘एमएसआरडीसी’ने येथे अत्याधुनिक अशी ‘आयटीएमएस’ यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

 या यंत्रणेसाठी एमएसआरडीसीने २०१९ मध्ये निविदा काढल्या होत्या. आता ही निविदा अंतिम झाली असून प्रकल्पाचे कार्यादेश ३ ऑगस्ट रोजी देण्यात आल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. ‘‘मेसर्स प्रोटेक्ट सोल्युशन लिमिटेड’’ या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले असून  काही दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. करारानुसार हे काम नऊ महिन्यांमध्ये पूर्ण करावे लागणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर महिनाभर यंत्रणेची चाचणी घेण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून वर्षभरात महामार्गावर ‘आयटीएमएस’ यंत्रणा प्रत्यक्षात कार्यान्वित होईल, असेही मोपलवार यांनी सांगितले.

प्रकल्पाला १६० कोटींचा खर्च

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सार्वजनिक-खासगी सहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून यासाठी अंदाजे १६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. द्रुतगती मार्गावर वाहतूक शिस्त पाळली जावी, अपघात टाळावे, अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, तसेच टोल वसुली जलद, अचूक, तसेच पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा बसविण्यात येणार आहे. संपूर्ण मार्गावर अत्याधुनिक सीसी टीव्ही कॅमेरे, ३९ ठिकाणी वाहनांचा वेग तपासणारी ‘‘अ‍ॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टीम’’, तर ३४ ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचा शोध घेणारी ‘‘लेन डिसिप्लेन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम’’ बसविण्यात येणार आहे.