शिवसेना पक्षाच्या प्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर आजच नवीन नेत्यांची नावेही ते जाहीर करणार होते मात्र अंतर्गत सत्तास्पर्धेमुळे नेते व उपनेत्यांची नियुक्ती करण्याचे त्यांनी टाळले. एवढेच नव्हे, तर ज्यांना ‘राजकारण’ करायचे असेल त्यांनी तात्काळ बाहेर पडावे, असे खडे बोलही सुनवले.
शिवसेनेत सध्या नेतेपदी नऊजण असून सेनानेते मधुकर सरपोतदार व प्रमोद नवलकर यांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त आहेत. या दोन जागांसाठी सेनेत सध्या अनेकजण इच्छुक असून शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे आणि लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते अनंत गिते यांची बुधवारी शिवसेना नेते म्हणून नियुक्ती करण्यात येणार होती. मात्र सेनेतील एका उपनेत्याने खैरे यांच्या नियुक्तीला कुजबूज विरोध केला तर काहीजणांनी आपली उपनेतेपदी निवड करण्याचा आग्रह धरला.
सध्या सेनेत मनोहर जोशी, सुधीर जोशी, दत्ताजी नलावडे, लीलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, गजानन किर्तीकर आणि संजय राऊत असे नेते असून आमदार नीलम गोऱ्हे, अनंत गिते, रविंद्रे मिर्लेकर, विलास अवचट, खासदार आनंद अडसूळ यांची नावे नेतेपदाच्या चर्चेत होती. सेनेचे सध्याचे सर्व नेते हे मुंबईतील असल्यामुळे आगामी निवडणूका लक्षात घेऊन मराठवाडा व कोकणाला प्रतिनिधीत्व मिळावे या दृष्टीकोनातून चंद्रकांत खैरे व अनंत गिते यांची नेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.