भामला फाऊंडेशनच्या ‘प्लास्टिक जनजागृती’विषयक मोहिमेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. या मोहिमेला संयुक्त राष्ट्र संघटनेकडून ‘जागतिक स्तरावरील प्लास्टिक जनजागृतीविषयक मोहीम’ म्हणून घोषित करण्यात आले. त्याचबरोबर या प्रभावी सांगीतिक मोहिमेला आपल्या पर्यावरणविषयक मोहिमेतही सामील करून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरातून या ‘टिक, टिक, प्लास्टिक टिक ना पाए रे.. ‘ गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. या सांगीतिक मोहिमेला याआधी राष्ट्रीय पुरस्कारानेही (नॅशनल ग्रीन अ‍ॅवॉर्ड) डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या न्यूयॉर्क (अमेरिका) येथील मुख्य कार्यालयात बोलावून भामला फाऊंडेशनला यावेळी सन्मानित करण्यात आले. तसेच भारताच्या पर्यावरण खात्यानेही याच गाण्याला आपल्या पर्यावरणविषयक जनजागृती मोहिमेत सामील करून घेतले आहे. विविध राज्यांमध्ये आणि शाळांमध्ये ही सांगीतिक मोहीम यशस्वी झाली आहे. या गाण्याला जगभरातील समाजिक संस्थांच्या उपस्थितीत न्यूयॉर्कमध्ये दाखवण्यात आले.

‘टिक, टिक, प्लास्टिक टिक ना पाए रे..’ या यू-टय़ुबवर गाजत असलेल्या गाण्याची निर्मिती भामला फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली होती. या गाण्याचे ५ जून या पर्यावरणदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. गाण्याच्या माध्यमातून प्लास्टिकच्या वापराबाबत जनजागृतीचा संदेश देण्यासाठी यामध्ये संगीत आणि बॉलीवूड क्षेत्रातील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. शक्य तिथे प्लास्टिकचा वापर टाळा आणि एका वेळेसच वापराच्या दर्जाच्या प्लास्टिकवर बंदी घाला, असा महत्त्वपूर्ण संदेश घेऊ न भामला फाऊंडेशनने या गाण्याची निर्मिती केली होती. प्रसिद्ध संगीतकार शान यांनी या गाण्याला संगीत दिले असून गीतरचना स्वानंद किरकिरे यांनी केली आहे. गाण्यासाठी शामक दावर यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. शंकर महादेवन, सोनू निगम, अरमान मलिक, सुनिधी चौहान, आयुषमान खुराणा, कनिका कपूर, नीती मोहन, शेखर रावजियानी आदी मान्यवर गायकांनी प्लास्टिकबंदी मोहिमेला पाठिंबा दर्शवीत या गाण्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. यू-टय़ुबपासून सर्व समाजमाध्यमांमध्ये गाण्याला चांगली लोकप्रियता मिळत आहे. याविषयी भामला फाऊं डेशनचे अध्यक्ष आसिफ भामला यांनी सांगितले की, यापुढेही विविध सामाजिक उपक्रम भामला फाऊंडेशनकडून राबवण्यात येणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International banner on bhamla foundations plastic publications song
First published on: 23-08-2018 at 02:14 IST