आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रकाशन
यंदा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांच्या वतीने ओम चिन्हासह विविध योगासनांची चित्रे असलेली प्रत्येकी दहा टपाल तिकिटे प्रकाशित केली जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावरही ‘योग दिन’ म्हणून साजरा केला जावा, अशी सूचना संयुक्त राष्ट्रांकडे केली होती. २०१४ मध्ये आमसभेत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. १७७ देशांनी त्याला पाठिंबा दिला होता. टपाल तिकिटांच्या प्रकाशनाचा हा विशेष कार्यक्रम २१ जून रोजी एकाच वेळी न्यूयॉर्क, जीनिव्हा, व्हिएन्ना येथे होणार आहे.
यानिमित्त जगभरातील अनेक देश आणि तेथील महत्त्वाच्या ठिकाणी सार्वजनिक स्तरावर योग आणि योगासने याविषयी माहिती देणारे उपक्रम राबवले जातात. यंदाच्या योग दिनाच्या निमित्ताने ‘युनो’कडून दहा टपाल तिकिटे प्रकाशित केली जाणार त्यात भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे प्रतीक असलेला ‘ओम’ टपाल तिकिटावर झळकणार आहे. तसेच योगशास्त्रातील योगासनांच्या काही आकृत्याही या टपाल तिकिटांवर असल्याची माहिती टपाल तिकीट संग्राहक मकरंद करंदीकर यांनी ‘लोकसत्ता मुंबई’ला दिली.
योग दिनाच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या टपाल तिकिटांमध्ये धनुरासनासह दहा योगासनांची चित्रे/आकृत्या तसेच वेगवेगळ्या रंगातील दहा ‘ओम’ आहेत. भारतीय योगशास्त्राची दखल ‘युनो’सारख्या जागतिक संघटनेने घेणे आणि टपाल तिकिटावर ओम व योगासनांना स्थान देणे ही सर्व भारतीयांसाठी नक्कीच अभिमानाची बाब असल्याचेही करंदीकर म्हणाले.