scorecardresearch

नवनीत राणांची ईडीमार्फत चौकशी करा : भुजबळ 

नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला या दाऊदच्या माणसाकडून ८० लाख रुपये घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Chagan Bhujbal reaction after the postponement of OBC reservation
(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : खासदार नवनीत राणा यांनी दाऊदचा हस्तक युसूफ लकडावालाकडून ८० लाख रुपये कशासाठी घेतले, कुणाच्या वतीने घेतले, याची मुंबई पोलिसांच्या वतीने व सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना केली. तर नवनीत राणा यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी गेलेल्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांना पोलिसांनी अटक केली. मंत्री नवाब मलिक यांनी ५ लाख रुपयांचा जमीन व्यवहार केला, तर त्यांच्यावर ईडीने कारवाई केली. ते दाऊदच्या माणसाकडून खरेदी केली असे म्हणतात, परंतु तसे कुठेही काही दिसत नाही. मात्र नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला या दाऊदच्या माणसाकडून ८० लाख रुपये घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

..नवनीत मागासवर्गीय आहेत का ?

नवनीत राणा या मागासवर्गीय नाहीत असे, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यामुळे मुळात त्या मागासवर्गीय आहेत का, याबाबतच प्रश्नचिन्ह आहे, असे भुजबळ म्हणाले. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. त्याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, सोमय्या यांच्या तोंडावर रक्तस्राव झालेला नाही असे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. तर मग त्यांच्या तोंडावर रक्त आले कुठून, दुसऱ्या दिवशी ते पत्रकार परिषदेत बोलत असताना तोंडावर जखम नव्हती, तेथे पट्टी लावलेली नव्हती, हे कसे काय झाले, असा सवाल करीत भुजबळ यांनी सोमय्या यांनी केलेल्या आरोपाचीच खिल्ली उडविली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Investigate navneet rana through ed says ncp chhagan bhujbal zws

ताज्या बातम्या