|| अनिश पाटील

मुंबई : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी गुन्हे गुप्तवार्ता विभागात (सीआययू) कार्यरत असताना तपास सुरू केलेली बहुसंख्य प्रकरणे संशयास्पद असल्याचे पोलीस विभागाच्या अंतर्गत तपासणीत निष्पन्न झाले आहे. अशा सुमारे २५ प्रकरणांचा तपास बंद करण्यात आला आहे. ‘सीआययू’चे प्रभारी असताना वाझे तपास करत असलेले १५ गुन्ह्योही इतर विभागांकडे वर्ग करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

 घाटकोपर येथे २००२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयित ख्वाजा युनूस याच्या पोलीस कोठडीतील कथित मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांना १६ वर्षांनंतर पुन्हा सेवेत घेण्यात आले. त्यांना गुन्हे गुप्तवार्ता कक्षाचे (सीआययू) प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले. ‘सीआययू’ विशेषत: गुंडांच्या टोळ्यांचे गुन्हे व दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करते. वाझे कार्यरत असताना आठ महिन्यांत ‘सीआययू’ विभागात १७ गुन्हे दाखल झाले. अँटेलिया स्फोटके व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझे यांना अटक झाल्यानंतर गुन्हे शाखेने वाझे तपास करत असलेले गुन्हे व तक्रारींची बारकाईने तपासणी करण्यास सुरुवात केली. त्यात टीआरपी प्रकरण व कार डिझायनर दिलीप छाब्रिया फसवणूक प्रकरण सोडल्यास इतर १५ गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेच्या इतर कक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. ती प्रकरणे सीआययूशी संबंधित नसल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हे शाखेच्या इतर कक्षांना पुढील तपास करण्यास सांगण्यात आले आहे. 

वाझे कार्यरत असताना ‘सीआययू’ विभागाकडे २५ तक्रारीही आल्या होत्या. त्या तक्रारींचा तपास बंद करण्यात आला आहे. ही प्रकरणे चुकीच्या उद्देशाने दाखल करून घेण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यापैकी काही तक्रारी निनावी होत्या. त्यामुळे त्या बहुसंख्य तक्रारींचा तपास पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

पालिका कंत्राटदारांविरोधात तक्रारी?

’पंचवीस तक्रारींपैकी पाच तक्रारी महापालिका कंत्राटदारांविरोधातील होत्या. गोरेगाव येथे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझेंबरोबरच सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात परमबीर सिंह यांनी वाझे यांना पालिका कंत्राटदारांकडून पैसे घेण्याची सूचना केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

’वाझे यांना अँटेलिया येथे स्फोटके ठेवल्याप्रकरणी, तसेच मनसुख हिरेन यांची हत्या केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) १३ मार्चला अटक केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

’त्यानंतर १ नोव्हेंबरला गुन्हे शाखेने गोरेगाव येथील खंडणी प्रकरणात वाझे यांचा ताबा घेतला. या प्रकरणी वाझे ६ नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत.