हिंदी चित्रपटसृष्टीत कोणतीही  पाश्र्वभूमी नसताना करिअर घडवणे अवघड आहे, असे आजही ठामपणे सांगितले जाते, किंबहुना चित्रपटसृष्टीतील घराणेशाही आणि बाहेरून येणाऱ्यांचा संघर्ष हा वाद इथे कायम सुरू असतो. अशा परिस्थितीत नव्वदच्या दशकांत टेलीव्हिजनवर ‘शांति’, ‘तनहा’सारख्या मालिकांमधून आणि त्यानंतर आतापर्यंत जाहिराती, हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपटांमधून चोखंदळ भूमिका करत आपले स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री इरावती हर्षे यांच्याशी संवाद साधण्याची संधी ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’मध्ये मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या क र्तृत्वाने विविध क्षेत्र गाजवणाऱ्या स्त्रियांचा प्रवास, त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा, त्यांचा संघर्ष जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘केसरी टूर्स’ प्रस्तुत ‘लोकसत्ता’च्या ‘व्हिवा लाऊंज’ उपक्रमाचे नवे पर्व इरावती हर्षे यांच्या उपस्थितीत रंगणार आहे. बुधवारी, २६ जून रोजी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे संध्याकाळी ४.४५ वाजता ‘व्हिवा लाऊंज’चे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत ‘अस्तु’, ‘कासव’, ‘आपला माणूस’, ‘गुड नाईट, टेक के अर’, ‘भाई : व्यक्ति की वल्ली’ अशा मराठी चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिकांमधून इरावती यांनी आपला ठसा उमटवला. त्यांच्या विविधांगी तरी चोखंदळ अशा अभिनय कारकीर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकांत झाली होती. ‘शांति’, ‘तनहा’, ‘मृत्युदंड’, ‘कभी कभी’, ‘वारिस’, ‘संजीवनी’सारख्या मालिकांमधून इरावती हर्षे हे नाव घरोघरी परिचयाचे झाले होते. टेलीव्हिजनवर एका टप्प्यानंतर झालेले बदल हे फारसे न रुचल्याने त्याच चौकटीतील भूमिका टाळण्याचे धाडस इरावती यांनी दाखवले. हिंदी चित्रपटांमध्येही ‘मिथ्या’, ‘हे राम’, ‘वुई आर फॅमिली’, ‘कच्चा लिम्बू’ अशा निवडक चित्रपटांमधून त्यांनी काम केले.

कुठल्याही साच्यात न अडकता सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होण्याचा ध्यास असलेली ही अभिनेत्री केवळ अभिनयावरच थांबलेली नाही. एक उत्तम डबिंग आर्टिस्ट म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. ‘गोल्डन कम्पास’, ‘फेस ऑफ’सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांच्या परदेशी आवृत्तीसाठीही त्यांनी डबिंग केले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे असे अनेक पैलू, अभिनेत्री म्हणून त्यांचा आजवरचा प्रवास, चित्रपट-टेलीव्हिजनमध्ये झालेले बदल अशा अनेक गोष्टींवर इरावती यांच्याक डून जाणून घेण्याची संधी व्हिवा लाऊंजच्या निमित्ताने मिळणार आहे.

  • कधी : बुधवार, २६ जून २०१९
  • वेळ : संध्याकाळी ४.४५ वाजता
  • स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, एस. व्ही. एस. रोड, दादर (पश्चिम).

या कार्यक्रमाला ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वाने प्रवेश दिला जाईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iravati harshe loksatta viva lounge
First published on: 23-06-2019 at 01:50 IST