जमीन हडपल्याप्रकरणी ‘आयआरबी’चे प्रमुख वीरेंद्र म्हैसकर यांच्याविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांनी केलेल्या तक्रारीच्या पुनर्तपासास उच्च न्यायालयाने शुक्रवारी हिरवा कंदील दाखवला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे म्हैसकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
शेट्टी यांच्या हत्येमागील हेतू शोधण्याच्या दृष्टीने म्हैसकर यांच्याविरुद्धच्या तक्रारीचा पुनर्तपास करायचा आहे. ही दोन्ही प्रकरणे परस्परपूरक आहेत. त्यामुळे या तक्रारीचा पुनर्तपास करण्याची परवानगी देण्याची मागणी सीबीआयतर्फे न्यायालयाकडे करण्यात आली. दुसरीकडे सरकारतर्फे तपासाची सूत्रे वर्ग करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी आणखी वेळ देण्याची विनंती करण्यात आली. मात्र वारंवार आदेश देऊनही निर्णय घेण्यास सरकार विलंब करीत असल्याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आणि नव्याने तपास करण्यासाठी तो सीबीआयकडे वर्ग करीत असल्याचे स्पष्ट केले. न्याय मिळण्याच्या दृष्टीने या तक्रारीचा पुनर्तपास होणे गरजेचे असल्याचेही हे आदेश देताना न्यायालयाने प्रामुख्याने नमूद केले.
शेट्टी यांनी म्हैसकर यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीवर प्रकरण बंद करण्याचा अहवाल स्थानिक पोलिसांनी मावळ महादंडाधिकाऱ्यांसमोर सादर केला होता. मात्र गेल्या १४ मार्च रोजी दंडाधिकाऱ्यांनी तो रद्द करीत प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र तपासाची सूत्रे देण्यास राज्य सरकार टाळाटाळ करीत असल्याने सीबीआयने त्यासाठी न्यायालयात याचिका केली होती.
प्रकरण काय आहे?
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासाठी राज्य सरकारने जागा विकत घेतली होती. त्यासाठी गावकऱ्यांना पैसेही दिले होते. मात्र बनावट कागदपत्रांच्या आधारे आयआरबी आणि अन्य तीन आरोपींनी ही जमीन पुन्हा नव्याने विकली आणि त्याद्वारे कोटय़वधी रुपये उकळले, अशी तक्रार शेट्टी यांनी लोणावळा पोलिसांकडे केली होती. मात्र २०११ मध्ये पोलिसांनी शेट्टी यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा करीत प्रकरण बंद करण्याची विनंती महानगरदंडाधिकाऱ्यांकडे केली. उच्च न्यायालयाने हा अहवाल रद्द करीत महानगरदंडाधिकाऱ्यांना या प्रकरणी नव्याने निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महानगरदंडाधिकाऱ्यांनी प्रकरण बंद करण्याबाबत पोलिसांनी सादर केलेला अहवाल रद्द केला होता.
संग्रहित लेख, दिनांक 9th Aug 2014 रोजी प्रकाशित
म्हैसकर यांच्या अडचणींत वाढ
जमीन हडपल्याप्रकरणी ‘आयआरबी’चे प्रमुख वीरेंद्र म्हैसकर यांच्याविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांनी केलेल्या तक्रारीच्या पुनर्तपासास उच्च न्यायालयाने शुक्रवारी हिरवा कंदील दाखवला.
First published on: 09-08-2014 at 04:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irb chief virendra mhaiskar