व्हिवा लाऊंजमध्ये ईशा केसकर, अपूर्वा नेमळेकर यांचा सहभाग

मुंबई : दोघांत तिसरा आला की तो नेहमीच रागाचा विषय ठरतो. मालिका आणि चित्रपटांमध्ये तर ही तिसरी व्यक्ती प्रेक्षकांनाही नकोशी वाटते. मात्र सध्या टीव्ही विश्वात आपापल्या ‘खल’भूमिकांमधून हे समीकरण खोटे ठरवत प्रेक्षकांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या, अबालवृद्धांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘शनाया’ फेम ईशा केसकर आणि ‘शेवंता’ फेम अपूर्वा नेमळेकर यांच्याशी गप्पा मारण्याची संधी ‘केसरी टूर्स’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’मधून मिळणार आहे.

तरुणाईची विशेष पसंती मिळालेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील शनाया आणि ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेत चक्क अण्णांचा दरारा असतानाही टेचात वावरणारी शेवंता या दोघीही ‘केसरी टूर्स’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या मंचावर पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. वसईतील ‘श्री अनंतराव ठाकूर नाटय़गृह’ येथे शनिवारी, १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ईशा केसकर आणि अपूर्वा नेमळेकर यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. शनायाच्या भूमिकेआधीही ईशा केसकर घरोघरी परिचयाची झाली ती बानूच्या भूमिकेतून.. ‘झी मराठी’  वाहिनीवरील ‘जय मल्हार’ मालिकेत बानूची भूमिका साकारणाऱ्या ईशाने मानसशास्त्राची पदवी घेतली आहे. प्रायोगिक नाटक, राज्य नाटय़ स्पर्धा असे रंगभूमीवरून अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या ईशाने मालिकांबरोबरच चित्रपटांमधूनही काम केले आहे. तर अपूर्वा नेमळेकर हाही टीव्ही विश्वासाठी नवा चेहरा नाही. ‘झी मराठी’ वाहिनीच्याच ‘आभास हा’ या मालिकेतून अपूर्वाने पदार्पण केले होते. व्यवस्थापन शास्त्रातील पदवी घेतलेल्या अपूर्वाने अभिनयाबरोबरच आपला ज्वेलरी डिझाईनिंगचा स्वतंत्र व्यवसायही उभा केला आहे.

वेगाने बदलत जाणाऱ्या मराठी चित्रपट- मालिका क्षेत्रात पूर्णपणे नव्याने सुरुवात करून स्वत:ची वाट धुंडाळणाऱ्या या दोघींचा आजवरचा प्रवास कसा होता? झटपट लोकप्रियता मिळवून देणाऱ्या या क्षेत्रात टिकाव धरून राहण्याचे आव्हान त्या कसे पेलत आहेत? अशा अनेक मुद्द्यांवर या दोघींशी ‘व्हिवा लाऊंज’मध्ये खुसखुशीत गप्पा मारण्याची ही संधी आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वाने कार्यक्रमाला प्रवेश दिला जाईल.

कधी?

शनिवार, १० ऑगस्ट २०१९

वेळ : सायं. ६ वाजता

कुठे ?

श्री अनंतराव ठाकूर नाटय़गृह, देशपांडे वाडा, परनाका, वसई (प.)