भारतात साखळी बॉम्बस्फोट घडविण्यासाठी आणलेली स्फोटके मी ऐनवेळी घाबरल्यामुळे गटारात फेकून दिली अशी कबुली इसिसमध्ये भरती झालेल्या मुंबईस्थित तरूणाने दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सुरक्षा यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आयसिसमध्ये भरती झालेल्या मुंबईतील मोहम्मद हुसैन खान गेल्यावर्षी दिल्लीत होता. त्यावेळी त्याने स्फोट घडविण्यासाठी खरेदी केलेली स्फोटके येथील गटारात फेकून दिल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सहा राज्यांच्या सुरक्षा यंत्रणांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईत आयसिसमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून १४ जणांना अटक करण्यात आली होती. मोहम्मद हा याच चौदा जणांपैकी एक आहे. मोहम्मदने दिलेल्या कबुलीनुसार त्याने दिल्लीतील एका व्यक्तीकडून १.५ किलो ‘पीईटीएन’ स्फोटक घेतले होते. मात्र, दिल्लीतील कडेकोट पोलीस बंदोबस्त पाहून मी घाबरलो आणि ती स्फोटके गटारात फेकून दिल्याचे मोहम्मदने सांगितले. ‘पीईटीएन’ हा जगभरातील दहशतवादी संघटनांकडून वापरण्यात येणारे अत्यंत शक्तिशाली स्फोटक पदार्थ आहे. मोहम्मद खान हा मुंबईच्या माझगाव परिसरात राहणारा असून त्याच्याबरोबर अटक करण्यात आलेल्या मुदब्बीर शेखने स्फोटके खरेदी करण्यासाठी आपल्याला पन्नास हजार रूपये दिल्याची माहितीही मोहम्मद हुसेनने दिली.
१२ संशयित दहशतवाद्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत कोठडी