इस्रोच्या मोहिमेतील सातवा विद्यार्थी उपग्रह

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) विद्यार्थ्यांच्या अंतराळ संशोधन कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या विद्यार्थी उपग्रह योजनेतील सातवा उपग्रह येत्या सोमवारी प्रक्षेपित होणार आहे. आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या या उपग्रहाचे नाव ‘प्रथम’ असून या उपग्रहाच्या माध्यमातून विद्युत परमाणु मोजता येणार आहेत.

विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान संशोधनात रस निर्माण व्हावा या उद्देशाने ‘इस्रो’ने विद्यार्थी उपग्रह योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सहा विद्यार्थी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. आयआयटी मुंबईत शिकत असलेल्या सप्तर्षी बंडोपाध्याय आणि शशांक तामसकर या दोन विद्यार्थ्यांनी २००७मध्ये या उपग्रहाची संकल्पना मांडली. यानंतर २००९मध्ये आयआयटी मुंबई आणि इस्रोमध्ये सामंजस्य करार झाला. या करारानुसार या उपग्रहाचे प्रक्षेपण २०१२मध्ये अपेक्षित होते. मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि काही तांत्रिक अडचणींमुळे उपग्रहाचे प्रक्षेपण होऊ शकले नाही. तरीही या प्रकल्पावर विद्यार्थ्यांचे काम सुरू होतेच. पुढे २०१४मध्ये सामंजस्य कराराला मुदतवाढ देण्यात आली. या नऊ वर्षांच्या वाटचालीनंतर सोमवारी हा उपग्रह अवकाशात झेपावणार आहे.

आतापर्यंत ३० विद्यार्थ्यांनी या उपग्रहावर काम केले असून त्याच्यासाठी दीड कोटी रुपये खर्च आला आहे. देशातील १५ विद्यापीठांमधील माहिती संकलन केंद्रांमध्ये उपग्रहात नोंदविलेल्या विद्युत परमाणुंची नोंद होणार आहे. या केंद्रांमध्ये मुंबईतील अथर्व महाविद्यालयाचाही समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro longest ever launch mission
First published on: 25-09-2016 at 02:02 IST