दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्रावरून उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर वादात उद्धव यांना एक पाऊल मागे घ्यावे लागले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्राला त्यांचा मुलगा जयदेव यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. परंतु त्यांनी पुराव्यादाखल सादर केलेली कौटुंबिक माहिती वगळण्यात यावी, ही शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मागणी न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. जयदेव यांनी पुराव्यादाखल सादर केलेली कौटुंबिक माहिती ही ऐकीव वा अयोग्य आहे. त्यामुळे ती वगळण्यात यावी, असे उद्धव यांचे म्हणणे होते. मात्र, न्यायालयात स्वत:ची बाजू कशी मांडायची, याचा जयदेव यांना संपूर्ण हक्क आहे. त्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही, असे नमूद करत न्यायालयाने हा अर्ज निकाली काढला. जयदेव यांनी कुटुंबियांच्या माहितीसह बाळासाहेबांशी संबंधित नऊ कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत. बाळासाहेबांवर लिलावती रूग्णालयात सुरू होते. याविषयीच्या कागदपत्रांची न्यायालयाने नोंद करून घेतली व इतर कागदपत्रे तपासणीसाठी न्यायालय प्रशासनाकडे पाठवली. न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यासमोर जयदेव यांनी दाखल केलेल्या दाव्याची सोमवारी सुनावणी झाली.
१७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेबांचे निधन झाले. त्यांचे मृत्यूपत्र प्रमाणित करून घेण्यासाठी उद्धव यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यावर जयदेव यांनी आक्षेप घेतल्याने सध्या याबाबत कायदेशीर वाद सुरू आहे. हे मृत्यूपत्र तयार करताना बाळासाहेबांची प्रकृती खालावलेली होती. त्यांची दिशाभूल करून हे मृत्यूपत्र तयार करण्यात आले आहे. मृत्यूपत्र प्रामणित करून घेण्यासाठी उद्धव हे न्यायालयात अर्ज करू शकत नाही, असा दावा जयदेव यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaidev thackeray and uddhav thackeray issueb
First published on: 19-04-2016 at 03:34 IST