अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आणि एक गट भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाला. असं असूनही हे दोन्ही गट आतून एकच आहेत. पुढील काळात ते कधीही एकत्र येऊ शकतात, अशा चर्चा केवळ सर्वसामान्यांमध्येच नाही, तर अगदी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांमध्ये असते. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सडेतोड भूमिका मांडली. ते बुधवारी (११ ऑक्टोबर) मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, “बऱ्याच जणांना अशी शंका आहे की, हे दोन्ही गट परत एकत्र आले, तर कशाला डोक्याला त्रास. अशी शंका प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे आम्हीच सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे की, आम्ही एक होणार नाही. सगळ्यांना ही शंका असल्याने कशाला घाई, कळ काढा, असं कार्यकर्ते एकमेकांना म्हणतात. एक महिला कार्यकर्ती दुसरीला म्हणते की, तुला काही कळतं का, ते आतून एकच आहेत. मी महिला कार्यकर्त्यांच्या मनातील बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तसं काहीही नाही. आपला पक्ष वाढू नये म्हणून केलेली ही शक्कल आहे. आपला पक्ष वाढू नये म्हणून ही कुजबुज केली जात आहे.”

“…त्यामुळे आता परतीचे दोर कापण्यात आले आहेत”

“शरद पवार आपला पक्ष वाचवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन बसतात. यात सगळंच आलं. कार्यकर्त्यांना यावरून काय प्रकार सुरू आहे हे सगळं लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे आता परतीचे दोर कापण्यात आले आहेत. आपल्याला लढायचं आहे. महाराष्ट्रात शरद पवारांचा करिष्मा, त्यांची ताकद, जनतेच्या मनातील शरद पवारांबद्दलचं आदराचं स्थान माझं आणि आपल्या कार्यकर्त्यांचं भांडवल आहे,” असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.

“समोरच्या बाजूने असं सांगितलं जाईल की, निवडणुकीला इतके पैसे खर्चायला देतो, पण…”

जयंत पाटील पुढे म्हणाले, “समोरच्या बाजूने असं सांगितलं जाईल की, निवडणुकीला इतके पैसे खर्चायला देतो, तेवढे देतो. ते सगळं होईल, मात्र शिक्का मारायला माणसं कुठून आणणार? मतं देणाऱ्या माणसांच्या मनात शरद पवार आहेत. त्यामुळे शरद पवार जिथं उभे राहतील, तिथं पक्ष असेल. आज निवडणूक आयोगाच्या दारात आमची लढाई सुरू आहे. त्या सुनावणीत शरद पवारांच्या कार्यशैलीवर भाष्य केलं जात आहे. २५ वर्षे शरद पवारांच्याच कार्यशैलीमुळे यांना पदं मिळाली, हे मंत्री झाले, वेगवेगळ्या पदांवर पोहचले. आज २५ वर्षानंतर त्यांच्याच कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करता, मग २५ वर्षे तुम्हाला त्यांच्या कार्यशैलीमुळे संधी मिळाली त्याचं काय?”

हेही वाचा : “बंडखोर आमदारांना तत्काळ अपात्र करा”, शरद पवार गटाच्या मागणीवर सुनील तटकरे म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शरद पवार हुकुमशाह, असा आरोप केला जात आहे, पण…”

“शरद पवार हुकुमशाह आहेत, असा आरोप केला जात आहे. मात्र, या कार्यक्रमात इतका वेळ ते बसले आहेत, एकदाही ते तू बोलू नकोस, तूच बोल, कुणीच बोलायचं नाही, आता मीच एकटा बोलणार असं काही बोलले नाहीत. शरद पवार हुकुमशाहीने, मनमानी करून पक्ष चालवतात असा आरोप केला जात आहे. मात्र, माझ्यासह इथं बसलेल्या कुणालाही तो अनुभव नाही. एकटा जालना जिल्ह्यातील निर्णय घ्यायचा असेल, तरी शरद पवारांनी राजेश टोपे आणि त्या जिल्ह्याच्या अध्यक्षासह कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय प्रमुख निर्णय कधीच घेतला नाही,” असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.