मुंबई : उत्तम कंपनीत नोकरीची संधी, चांगल्या वेतनाची हमखास खात्री यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांचे आयआयटीमधून शिक्षण घेण्याचे स्वप्न असते. मात्र जेईई ॲडव्हान्सच्या संयुक्त अंमलबजावणी समितीने (जेआयसी) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात जेईई परीक्षेत अव्वल आलेल्या ३३९ विद्यार्थ्यांनी आयआयटीतील प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. तर, जेईई परीक्षेत पहिल्या १०० विद्यार्थ्यांनी २३ पैकी २० आयआयटीमध्ये प्रवेशास नापसंती दर्शवली आहे.
आयआयटीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये दरवर्षी चुरस पाहायला मिळते. यंदाच्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेनंतर झालेल्या प्रवेशाबाबत जेईईच्या अहवालानुसार पहिल्या पाच हजार क्रमवारीत आलेल्या ३३९ विद्यार्थ्यांनी देशातील आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यास नापसंती दर्शवली आहे. या विद्यार्थ्यांनी आयआयटीऐवजी परदेशी विद्यापीठे, संशोधन संस्थांमधील प्रवेशाला प्राधान्य दिले असून काही विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसह परदेशात प्रवेश मिळवला आहे. आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या १०० क्रमवारीतील दोन विद्यार्थी, पहिल्या २०० क्रमवारीतील चार विद्यार्थी, पहिल्या ५०० मधील १६, पहिल्या १००० मधील ४२ आणि पहिल्या २००० मधील ७९ विद्यार्थांचा समावेश आहे.
तीनच ‘आयआयटी’ला पसंती
जेईईमध्ये अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरविण्याबरोबरच देशातील २३ पैकी २० आयआयटींमध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल नसल्याचेही अहवालात म्हटले आहे. त्यात पहिल्या १०० मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांनी २३ पैकी २० आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यास नापसंती दर्शवली आहे. त्याचबरोबर पहिल्या २०० क्रमवारीत आलेल्या विद्यार्थ्यांनी १९ आयआयटीमध्ये, पहिल्या ५०० क्रमवारीत असलेल्या विद्यार्थ्यांनी १६, पहिल्या १००० क्रमवारीत असलेल्या १२ आणि पहिल्या दोन हजार क्रमवारीत आलेल्या विद्यार्थ्यांनी नऊ आयआयटींना प्रवेशासाठी नापसंती दर्शवली आहे. त्यात धनबाद, जोधपूर, मंडी, भुवनेश्वर, जम्मू, गोवा, भिलाई, पलक्कड, धारवाड, रोपार, पटना, तिरुपती, गुवाहाटी, आयआयटी-बीएचयू वाराणसी, इंदूर, गांधीनगर, खरगपूर, रुरकी, हैदराबाद व कानपूर या आयआयटी संस्थांचा समावेश आहे.
आयआयटी मुंबई, दिल्लीला सर्वाधिक पसंती
पहिल्या १०० मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईला सर्वाधिक पसंती दर्शवली. यामध्ये आयआयटी मुंबईमध्ये १०० पैकी ७३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर, आयआयटी दिल्लीमध्ये १९ अणि आयआयटी मद्रासमध्ये सहा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्याचप्रमाणे पहिल्या १००० पैकी आयआयटी मुंबईमध्ये २५२ तर, आयआयटी दिल्लीमध्ये १९६ जणांनी प्रवेश घेतले.
‘आयआयटी’ला विद्यार्थ्यांची पाठ का?
जुन्या आणि नामांकित आयआयटींच्या तुलनेत नवीन आयआयटी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटची अडचण येते. नवीन आयआयटीमध्ये प्लेसमेंटसाठी कमी कंपन्या येतात आणि तुलनेने वेतनही कमी असते. मोठ्या आयआयटीमधील विद्यार्थ्यांना चांगले आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रस्ताव मिळतात. संशोधन आणि स्टार्टअपमध्येही चांगल्या संधी मिळतात. लहान आयआयटीमधील विद्यार्थ्यांना स्टार्टअप्ससाठी निधी मिळवण्यातही अडचणी येतात, त्यामुळे विद्यार्थ्यांकडून नवीन आयआयटीला कमी पसंती मिळत असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.