अभिनेत्री जिया खानला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या सूरज पांचोली याला महानगरदंडाधिकाऱ्यांनी २७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर लगचेच सूरजने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. शुक्रवारी त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
पोलिसांना सध्या आपल्या कोठडीची गरज नसून पोलिसांनी त्याचा जबाबही नोंदवला आहे. त्यामुळे आपल्याला जामीन मंजूर करण्याची विनंती सूरजने न्यायालयाकडे केली आहे. दरम्यान, पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सूरजच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची पोलिसांनी केलेली विनंती न्यायालयाने फेटाळत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. जियाने आत्महत्या करण्यापूर्वी सूरजला उद्देशून लिहिलेल्या पत्रात ‘बलात्कार’ शब्दाचा उल्लेख आढळून आला आहे. त्या दृष्टीने तपास करायचा आहे. सूरजच्या हस्ताक्षराचे नमुनेही घ्यायचे असल्याने पोलिसांनी त्याची कोठडी मागितली होती. दरम्यान, जियाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रियकर सूरजवर आरोप केले होते. या पत्रावर जियाची सही नव्हती. सूरजला लिहिलेली पाच प्रेमपत्रेही पोलिसांना सूरजच्या घरातून मिळाली होती. त्यावरही जियाची सही नव्हती. ही पत्रे जियाची नसल्याचा दावा सूरजच्या वकिलांनी केला होता.
जियाच्या उत्तर पत्रिका लंडनहून मागवणार
जियाने लिहिलेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षर पडताळण्यासाठी पोलीस थेट लंडनहून तिच्या महाविद्यालयातून तिच्या हस्ताक्षरातील उत्तरपत्रिका मागविण्यात येणार आहे तसेच जियाचे ज्या बॅंकेत खाते आहे. त्या बॅंकेतून तिचा अर्ज मागवून हस्ताक्षर तपासण्यात येणार आहे. ही पत्र तिची असल्याचे सिद्ध झाल्यास पुढची कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले.