केजी टू पीजी मोर्चात राज्य सरकारवर टीकेची झोड उठवणा-या युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. स्वतःच्या सरकारला आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना नालायक म्हणण्याचे धाडस फक्त बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरेच दाखवू शकतात असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.
युवासेनेच्या वतीने शनिवारी शिक्षण धोरणाच्या निषेधात गिरगाव चौपाटी ते मरिन ड्राइव्ह असा मोर्चा कााढण्यात आला होता. या वेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसेना सत्तेत असली तरी सरकारवर जोरदार हल्ला चढविला होता. गेल्या दीड वर्षांत अनेक वेळा शिक्षणमंत्र्यांना भेटलो, तेव्हा आश्वासन मिळाले होते की प्रश्न सोडवतो पण गेल्या दीड वर्षांतला प्रवास पाहिला तर हे सरकार सुशासन नसून आश्वासन सरकार झालेले आहे. आधीच्या सरकामध्ये आणि आताच्या सरकारमध्ये काही फरक वाटत नाही असे सांगत आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. आदित्य ठाकरेंच्या टीकेमुळे भाजप आणि शिवसेनेतील विसंवाद पुन्हा एकदा समोर आला होता.
आदित्य ठाकरेंच्या या टीकेवरुन जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. स्वतःच्या सरकारवर टीका करण्याचे धाडस फक्त आदित्य ठाकरेच दाखवू शकतात. त्यांचे अभिनंदन अशी खोचक टीका करणारे ट्विट आव्हाड यांनी केले. राज्य सरकारमधील शिवसेनेचे मंत्री निष्क्रीय असल्याचे मातोश्रीला पटले आहे आणि त्यांने हे जनतेसमोर मान्य केले असे आव्हाड यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे. आव्हाड यांच्या टीकेवर शिवसेनेकडून अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 16th Oct 2016 रोजी प्रकाशित
असे धाडस फक्त आदित्य ठाकरेच दाखवू शकतात – आव्हाडांचा टोला
आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केल्याच्या पार्श्वभूमीवर आव्हाडांनी ठाकरेंना चिमटा काढला आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 16-10-2016 at 12:44 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad take a jib on aditya thackeray