प्रशिक्षणार्थी नेमण्याचा मुंबई मेट्रोचा निर्णय

देशातील महत्त्वाकांक्षी आणि तांत्रिकदृष्टय़ा गुंतागुंतीच्या अशा ‘मुंबई मेट्रो ३’ या प्रकल्पात अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. अभियांत्रिकी, व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना या प्रकल्पाच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.’ (एमएमआरसीएल)ने उन्हाळी आणि हिवाळी सुटय़ांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत सध्या कुलाबा ते सिप्झ या ३३.५ या भुयारी मेट्रो मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा प्रकल्प देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. त्यामुळे या प्रकल्पाबाबत जगभरातील अभियांत्रिकी क्षेत्रात उत्सुकता आहे. या प्रकल्पाचे काम पाहण्याची संधी देशातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळावी, या उद्देशाने ‘एमएमआरसीएल’ने उन्हाळी आणि हिवाळी सुट्टीत सहा आठवडय़ांच्या कालावधीसाठी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना या प्रकल्पाच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होता येणार आहे. याकरिता अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांबरोबर इतर विषयांच्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळणार असल्याचे ‘एमएमआरसीएल’चे नियोजन विभागाचे कार्यकारी संचालक आर. रमण्णा यांनी सांगितले.

आज देशातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये सुट्टय़ांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याची सूचना केली जाते. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिक कामाचा अनुभव मिळावा यासाठी हा आग्रह धरला जातो. त्यांनी केलेल्या या कामाची त्यांची शैक्षणिक कामगिरी ठरविताना नोंदही घेतली जाते. मेट्रो-३चे काम हे अभियांत्रिकीच नव्हे तर व्यवस्थापन क्षेत्राकरिताही आव्हानाचे आहे. या योजनेअंतर्गत दोन्ही हंगामात ६० ते ७० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यातील काही विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. तर काहींना कंपनीने नेमलेल्या कंत्राटदारांकडे काम करण्याची संधी मिळेल, असे रमण्णा यांनी स्पष्ट केले. सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, पर्यावरण अशा विविध शाखांमधील विद्यार्थ्यांबरोबरच जनसंपर्क, व्यवस्थापन पदवी अशा विविध अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांचा सहा आठवडय़ांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक अहवाल सादर करावयाचा आहे. या अहवालातील काही सूचनांची दखलही घेतली जाणार असल्याचे रमण्णा म्हणाले.

प्रशिक्षणाची किमान पात्रता

प्रशिक्षण कालावधीसाठी निवडल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकीचे पदवी शिक्षण घेणाऱ्या तृतीय वर्षांची परीक्षा दिलेले विद्यार्थी, तर पदव्युत्तर पदवी प्रशिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्ष पूर्ण केलेले विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. निवड प्रक्रियेचा तपशील योग्य वेळी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे.

प्रकल्पाला भेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकल्पाचे काम पाहण्यासाठी पुण्यातील सैन्यदलाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी भेट दिली होती. यानंतर अ‍ॅमिटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही या प्रकल्पाची आणि त्याच्या कामाची माहिती घेण्यासाठी मुंबईत आले होते. यावर्षी पुन्हा सैन्यदल अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी भेट देणार असल्याचे रमण्णा यांनी सांगितले.