मुंबई : पश्चिम रेल्वेने जोगेश्वरी येथे मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी टर्मिनस उभारण्याचा निर्णय घेतला असून तेथे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’साठी यार्ड उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर तेथे  मालगाड्यांनाही थांबा मिळणार आहे. परिणामी, येत्या काही वर्षांमध्ये जोगेश्वरी रेल्वेगाड्यांचे प्रमुख केंद्र बनण्याची चिन्हे आहेत.

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर लांबपल्ल्याच्या गाड्यांचा वाढता भार लक्षात घेऊन आणखी एक छोटेखानी  टर्मिनस उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर सध्या सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर येथून मेल, एक्स्प्रेस गाड्या सोडण्यात येतात.  पनवेल टर्मिनसचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर पश्चिम रेल्वेवर मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस येथून मेल, एक्स्प्रेस सुटतात. मात्र लांबपल्ल्याच्या गाड्यांची संख्या लक्षात घेता ही टर्मिनस अपुरी पडत असून मुंबई उपनगरात आणखी एक छोटे टर्मिनस उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानुसार जोगेश्वरीत टर्मिनस उभारण्याच्या प्रस्तावाला २०१९ मध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा नव्याने नोव्हेंबर २०२१ मध्ये पाठविलेल्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने २०२२ मध्ये मंजुरी दिली. जोगेश्वरी टर्मिनस हे सध्याच्या स्थानकालगतच पूर्वेला उभे राहणार आहे. या टर्मिनसमध्ये एक फलाट आणि तीन मार्गिकांचा समावेश असेल.  यापैकी एका मार्गिकेचा वापर मेल, एक्स्प्रेस गाड्या  उभ्या करण्यासाठी होईल. १२ मेल, एक्स्प्रेस येथून सोडण्याचे नियोजन आहे. त्याचा आराखडा, खर्च आदी बाबींवर  काम सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली. यासाठी अंदाजित ६५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

Megablock, Central Railway,
रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
uran potholes marathi news
उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द

याशिवाय वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांसाठी  यार्ड उभारण्याची योजना असून ते राम मंदिर स्थानकाच्या दिशेला असेल. त्याच्याही आराखड्याचे काम सुरू असून लवकरच त्याला अंतिम रूप देण्यात येईल, असे ठाकूर म्हणाले. यासाठी अंदाजित १९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वंदे भारत रेल्वेगाड्यांसाठी आठ स्टेबल मार्गिका, शेड बनविली जाईल. जोगेश्वरी स्थानकाजवळील दोन स्टेबल मार्गिका तोडून त्या जागी नव्या स्टेबल मार्गिका उभारण्यात येणार आहेत.

मेल, एक्स्प्रेससाठी जोगेश्वरी टर्मिनस, वंदे भारतअंतर्गंत वातानुकूलित रेल्वे गाड्यांसाठी यार्डची उभारणी करण्यात येणार असून टर्मिनस उभे राहताच मालगाड्यांचीही वाहतूक करण्याचे नियोजन असेल. सध्या जोगेश्वरी स्थानकमार्गेही मोठ्या प्रमाणात अप-डाऊन लोकल गाड्या धावत असतात. त्यामुळे भविष्यात जोगेश्वरी हे रेल्वेगाड्यांचे केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.