मुंबई : पश्चिम रेल्वेने जोगेश्वरी येथे मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी टर्मिनस उभारण्याचा निर्णय घेतला असून तेथे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’साठी यार्ड उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर तेथे  मालगाड्यांनाही थांबा मिळणार आहे. परिणामी, येत्या काही वर्षांमध्ये जोगेश्वरी रेल्वेगाड्यांचे प्रमुख केंद्र बनण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर लांबपल्ल्याच्या गाड्यांचा वाढता भार लक्षात घेऊन आणखी एक छोटेखानी  टर्मिनस उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर सध्या सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर येथून मेल, एक्स्प्रेस गाड्या सोडण्यात येतात.  पनवेल टर्मिनसचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर पश्चिम रेल्वेवर मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस येथून मेल, एक्स्प्रेस सुटतात. मात्र लांबपल्ल्याच्या गाड्यांची संख्या लक्षात घेता ही टर्मिनस अपुरी पडत असून मुंबई उपनगरात आणखी एक छोटे टर्मिनस उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानुसार जोगेश्वरीत टर्मिनस उभारण्याच्या प्रस्तावाला २०१९ मध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा नव्याने नोव्हेंबर २०२१ मध्ये पाठविलेल्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने २०२२ मध्ये मंजुरी दिली. जोगेश्वरी टर्मिनस हे सध्याच्या स्थानकालगतच पूर्वेला उभे राहणार आहे. या टर्मिनसमध्ये एक फलाट आणि तीन मार्गिकांचा समावेश असेल.  यापैकी एका मार्गिकेचा वापर मेल, एक्स्प्रेस गाड्या  उभ्या करण्यासाठी होईल. १२ मेल, एक्स्प्रेस येथून सोडण्याचे नियोजन आहे. त्याचा आराखडा, खर्च आदी बाबींवर  काम सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली. यासाठी अंदाजित ६५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jogeshwari hub trains yard vande bharat railway stop mumbai print news ysh
First published on: 04-08-2022 at 12:16 IST