मुंबई : दरवर्षी गोपाळकाल्याच्या दिवशी ‘गोविंदा रे गोपाळा’ अशा घोषणा देत गोविंदा उंच थर रचण्याचा प्रयत्न करीत असतात. मुंबई-ठाण्यातील समस्त लहान-मोठी गोविंदा पथके उंच थर रचण्यासाठी प्रयत्न करीत असतात. मागील काही वर्षांपासून थर रचण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू झाली असून यामध्ये मुंबईतील पश्चिम उपनगरांतील गोविंदा पथके नऊ थर रचण्यात आघाडीवर आहेत. जोगेश्वरीतील जय जवान गोविंदा पथकाच्या नावावर सर्वाधिक उंच थर रचण्याचा विक्रम आहे. यंदा १० थर उभारून विक्रम नोंदविण्याचा प्रयत्न काही गोविंदा पथकांकडून होण्याची शक्यता आहे.

दहीहंडी उत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असून, सर्व गोविंदा पथके थर रचण्याची जय्यत तयारी करीत आहेत. मागील दीड महिन्यांपासून पथकांचा सराव सुरू आहे. सध्या सहा, सात व आठ व नऊ थरांसाठी अधिक बक्षीसे असल्याने गोविंदा पथकांचा कल सहापेक्षा अधिक थर रचण्याकडे आहे. लहान गाेविंदा पथकेही सहा थर रचण्यासाठी आग्रही आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक अधिक थर रचण्याच्या प्रयत्ना गोविंदा पथके आहेत. मुंबईमधील जाेगेश्वरीतील जय जवान गोविंदा पथकाने यापूर्वीच सर्वाधिक उंच थर रचण्याचा विक्रम केला असून गेल्या काही वर्षांपासून हे पथक आपला हा विक्रम मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे.

जय जवान गोविंदा पथकाने २०१२ मध्ये ठाण्यात प्रथमच नऊ थर रचून विक्रम केला होता. त्यानंतर या पथकाने त्याचवर्षी ऑक्टोबरमध्ये स्पेनमधील पथकाच्या विक्रमाची बरोबरी केली होती. त्यानंतर या पथकाने साडे नऊ थर रचून आपलाच विक्रम मोडीत काढला. यंदा हे गाेविंदा पथक आपला विक्रम पुन्हा मोडीत काढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे यंदा दहीहंडी उत्सवात एक नवा विक्रम होण्याची शक्यता आहे. जय जवान गोविंदा पथकापाठोपाठ जोगेश्वरीतील आर्यन गाेविंदा पथक व कोकण नगर गोविंदा पथक आणि अंधेरी (पूर्व) येथील मालपा डोंगरी, त्याचबरोबर सांताक्रुझमधील विघ्नहर्ता, बोरिवलीतील शिवसाई गोविंदा पथक नऊ थर रचण्यात आघाडीवर आहेत. त्याचबरोबर वडाळा येथील यश गोविंदा पथक, अष्टविनायक गोविंदा पथकही लिलया नऊ थर रचत आहेत. तसेच गतवर्षी आठ थर रचणारे हिंदमाता गोविंदा पथक नऊ थरांचा प्रयत्न करणार आहे.

महिला गोविंदांमध्येही थरांची चुरस

काही वर्षांपूर्वी महिला गोविंदा पथके सुरू झाली. यावेळी अनेक महिला गोविंदा पथकांनी पाच थर रचूनन सुरुवात केली. मात्र यावरच ही गोविंदा पथके थांबलेली नाहीत. ही गोविंदा पथकेही थरांच्या स्पर्धेत उतरली आहेत. सात थर रचणारे विलेपार्ले येथील पार्ले स्पोर्ट्स क्लबचे महिला गोविंदा पथक आघाडीवर आहे. त्याखालोखाल गोरेगावमधील स्वास्तिक, ठाण्यातील शिवतेज व संकल्प ही दोन महिला गोविंदा पथके सहा थर रचत आहेत. यंदा ही गाेविंदा पथके किती थर रचतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यंदा १० थरांचा प्रयत्न

आपलाच विक्रम मोडीत काढण्याचा निर्धार यंदा पथकाने केला आहे. यापूर्वी पथकाने साडेनऊ थर चलले होते. मात्र यंदा १० थर रचण्याचा निर्धार पथकातील गोविंदांनी केला आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. मात्र हे थर कोठे रचणार याबाबत निर्णय घेतलेला नाही, असे जय जवान गोविंदा पथकाचे प्रमुख संदीप ढवळे यांनी सांगितले.