आरोपीला तीन वर्षांचा कारावास
मुंबई : दक्षिण मुंबईतील बागेत ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या तरुणीचा पाठलाग करणाऱ्या, तसेच तिच्यासमोर आक्षेपार्ह चाळे करणाऱ्या ५६ वर्षांच्या आरोपीवर अवघ्या दोन दिवसांत खटला चालवून महागरदंडाधिकाऱ्यांनी त्याला त्याच्यावरील आरोपांत दोषी ठरवले व तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणी १८ सप्टेंबरला लैंगिक छळवणुकीची तक्रार नोंदवण्यात आली होती. ४ ऑक्टोबरला खटला सुरू झाला आणि दुसऱ्या दिवशीच न्यायालयाने आरोपीने केलेल्या गुन्ह्यात दोषी ठरवून त्याला शिक्षा सुनावली.
राजकुमार नारायण तांडेल असे आरोपीचे नाव असून यापूर्वीही त्याला अशाच प्रकारच्या गुन्ह्यात शिक्षा झाली होती. आरोपीने पीडित तरुणीसमोर केलेले आक्षेपार्ह कृत्य हे हेतूत: होते. पीडित तरुणीला मासनिक त्रास देण्याच्या व अपमानास्पद वागणूक देण्याच्या दृष्टीने हे कृत्य केल्याचे महानगरदंडाधिकारी यशश्री मरूळकर यांनी आदेशात म्हटले.
पीडित तरुणी चर्नी रोड येथे कामाला आहे. १८ सप्टेंबरला सायंकाळी पाऊणेसहाच्या सुमारास ती सनदी लेखापाल अभ्यासक्रमाचे ऑनलाइन वर्ग असल्याने जवळच असलेल्या बागेत गेली. तेथे अभ्यास करत असताना आरोपीने तिच्यासमोर आक्षेपार्ह चाळे करण्यास सुरुवात केली. घाबरून ती तेथून निघाली मात्र, आरोपीने तिचा पाठलाग केला. अखेर पीडित तरुणीने बागेत बसलेल्या दोघांकडे मदत मागितली. त्या दोघांनी आरोपीला पकडले व पीडित तरुणीने पोलिसांशी संपर्क साधला.
लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी आरोपीला अटक केली. ४ ऑक्टोबरला न्यायालयाने आरोपीवर आरोप निश्चित केले. आरोपीने आरोप अमान्य केले. त्यामुळे खटला चालवण्यात आला. आरोपीवर अशाच प्रकारच्या गुन्ह्यात यापूर्वी दोन स्वतंत्र पोलीस ठाण्यांत गुन्हा नोंदवण्यात आल्याची आणि त्यातील एकामध्ये त्याला शिक्षा झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्याने न्यायालयाला दिली.
आरोपी दयेस अपात्र
न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आरोपीने वृद्ध आई आणि त्याच्या विविध आजारांचा दाखला दिला व शिक्षेत दया दाखवण्याची मागणी केली. परंतु अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये दया दाखवली जाऊ शकत नाही. उलट अशा प्रकारच्या गुन्ह्यांत न्यायालयाने अत्यंत संवेदनशीलता दाखवणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने म्हटले. ही शिक्षा केवळ आरोपीलाच नव्हे तर असे गुन्हे करण्यापासून रोखण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे न्यायालयाने म्हटले.