किराणा दुकानात गेल्यावर एक कळकट्ट वही हातात घेऊन दुकानदार सांगत असलेली मागणी नोंदविणारी एक व्यक्ती आपण प्रत्येकाने एकदा तरी पाहिली असेल. ही व्यक्ती किरकोळ विक्रेता आणि कंपन्या यांच्यातील दुवा मानली जाते. मात्र या व्यक्तीची जागा आता अ‍ॅपने घेतली असून यामुळे किरकोळ विक्रेता आणि विविध कंपन्या यांचा थेट संपर्क साधणे शक्य झाले आहे. सध्याच्या उत्सवाच्या काळात ग्राहकांना विविध सवलती दिल्या जात आहेत. अशाच सवलती आणि काही आकर्षक सुविधा किरकोळ विक्रेत्यांना थेट ब्रॅण्ड्सकडून उपलब्ध केल्या जातात. या सेवांची माहिती थेट दुकानदारांपर्यंत पोहोचवून त्यांच्या मागण्या कंपन्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सुविधा ‘जस्ट बाय लाइव्ह’ या अ‍ॅपच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. इतकेच नव्हे तर वस्तूंच्या वितरणाची सुविधाही कंपनीमार्फत पुरविली जात आहे. यामुळे कंपन्या आणि किरकोळ विक्रेते यांना थेट संपर्क साधणे शक्य झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वारेमाप सवलती आणि ‘एकावर एक मोफत’सारख्या ऑफर्स घेऊन फ्लिपकार्टने २०१४ मध्ये सालाबादप्रमाणे ‘बिग बिलियन सेल’ सुरू केला. त्या वेळेस खरेच इतक्या सवलतीसह देऊन किरकोळ विक्रेत्यांना या गोष्टी विकणे परवडतात कशा, असा प्रश्न निर्माण झाला. इतकेच नव्हे तर जे विक्रेते ऑनलाइन विक्रीत सहभागी नव्हते अशा विक्रेत्यांनाही त्याचा फटका बसू लागला. या सर्वाचा अभ्यास करत असताना गेल्या १५ वर्षांपासून वस्तू वितरण व्यवसायात कार्यरत असलेल्या साहिल सानी यांनी ब्रॅण्ड्स आणि किरकोळ विक्रेत्यांना जोडणारी काही तरी व्यवस्था असावी यावर विचार करण्यास सुरुवात केली. त्यानुसार सानी यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना कसे एकत्र आणता येईल यावर काम सुरू केले. त्यांच्यासोबत भारत भालचंद्रन यांनी कामास सुरुवात केली. यातून ‘जस्ट बाय लाइव्ह’ या अ‍ॅपची सुरुवात झाली. साधारणत: वर्षभराच्या अवधीत या अ‍ॅपवर ६५ हजारांहून अधिक किरकोळ विक्रेते असून २६००हून अधिक ब्रॅण्डसचे तीन लाखांपर्यंत उत्पादने विक्री आणि वितरणासाठी उपलब्ध आहेत.

कंपन्या आणि दुकानदार यांच्यामध्ये काम करणारी एक नवी यंत्रणाच या अ‍ॅपच्या माध्यमातून उभी राहिली आहे. या अ‍ॅपमध्ये विक्रेत्यांनी आणि किरकोळ दुकानदारांनी नोंदणी करावयाची आहे. ही नोंदणी करत असताना व्हॅट क्रमांक, दुकानाचा परवाना आदी आवश्यक सहा कागदपत्रांची आवश्यकता असते. ती पूर्ण करून नोंदणी करावयाची आहे. नोंदणी झाल्यावर विक्रेत्यांना त्यांना पाहिजे त्या कंपनीची उत्पादने पाहता येणार आहे. याचबरोबर कंपन्याही हजारो दुकानदारांशी एकाच वेळी संवाद साधू शकणार आहेत. यामुळे कंपन्यांचा दुकानदारांपर्यंत पोहोचण्यचा वेळ वाचतो तर त्यांना नेमका पाहिजे त्या ग्राहकांपर्यंत पोहोचणे त्यांना शक्य होते. कंपनीने त्यांच्या उत्पादनांच्या संदर्भात काही नवी योजना आणली तर ती काही सेकंदांमध्ये अ‍ॅपवर अद्ययावत होते आणि थेट किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहचते असे साहिल यांनी अ‍ॅपच्या कामकाजाविषयी बोलताना स्पष्ट केले. या अ‍ॅपच्या माध्यमातून दुकानदार त्याला पाहिजे त्या उत्पादनाची मागणी कंपनीकडे नोंदवू शकतो. ही मागणी कंपनीच्यावतीने ‘जस्ट बाय लाइव्ह’ किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचवते. ही मागणी नोंदविल्यावर त्याची पोच, पैसे मिळाल्यावर तयाची पोच, किती पैसे बाकी आहे किती भरले आहेत आदी सर्वाचा तपशील या अ‍ॅपमध्ये उपलब्ध होतो. यामुळे किरकोळ विक्रेत्यांना कोणत्या कंपनीला कितीचे देणे आहे हे लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही. तर आपण नोंदविलेली मागणी आपल्यापर्यंत कधी पोहोचणार याचा तपशीलही या अ‍ॅपद्वारे किरकोळ विक्रेत्याला मिळू शकतो. तसेच ‘जस्ट बाय लाइव्ह’ने ‘रिलिगर फिनव्हेस्ट’सोबत सहकार्य करून किरकोळ विक्रेत्यांना उधारीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

गुंतवणूक आणि उत्पनस्रोत

व्यवसायोपयोगी नवउद्यमींना सध्या सुगीचे दिवस आहेत. या नवउद्योगांतील गुंतवणुकीचा परतावा मिळण्याची सर्वाधिक शाश्वती असल्याने या विभागातील नवउद्योगांना सध्या सर्वाधिक निधी उपलब्ध होत आहेत. यामुळे या विभागातील नवउद्यमी नानाविध प्रयोग करत आहेत. ‘जस्ट बाय लाइव्ह’मध्ये सुरुवातीच्या काळात स्वत:जवळचा निधी वापरला असून जानेवारीमध्ये अल्फा कॅपिटल अ‍ॅडव्हायझरच्या सहकार्याने २० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक मिळवली आहे. या कंपनीचा उत्पन्नस्रोत हा अ‍ॅपच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारातून मिळणारा काही टक्के हिस्सा हा आहे. याचबरोबर अ‍ॅपवर ब्रॅण्ड्सच्या जाहिराती करणे आणि अ‍ॅपच्या माध्यमातून निर्माण झालेल्या माहितीचा वापर यातून उत्पन्न होत असल्याचे साहिल यांनी नमूद केले.

भविष्यातील योजना

या कंपनीने आणलेली संकल्पनाच नवीन असल्यामुळे ती रुजण्यास अजून काही कालावधी जावा लागणार आहे. सध्या मुंबई आणि दिल्लीपुरती मर्यादित असेलली ही सेवा देशातील इतर भागांतही पसरविण्याचा विचार आहे. याचबरोबर आम्ही उभ्या केलेल्या गोदामांमध्ये कंपन्या त्यांची उत्पादने मोफत ठेवू शकतील अशी सुविधाही उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस असल्याचे साहिल यांनी नमूद केले.

नवउद्यमींना सल्ला

नवउद्योग सुरू करताना त्यातून उत्पन्न कसे होईल याचा विचार प्रामुख्याने केला पाहिजे असा मौलिक सल्ला साहिल यांनी नवउद्यमींना दिला आहे. तर निधी उभा करणे अवघड झाले असून बाजारातून निधी मिळेल यावर अवलंबून राहू नका. निधी उभारण्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत त्याचा अवलंब करा आणि व्यवसायाला सुरुवात करा असेही साहिल यांनी नमूद केले.

नीरज पंडित -niraj.pandit@expressindia.com

@nirajcpandit

 

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Just buy live e distributor for android users
First published on: 19-10-2016 at 03:05 IST