महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात वर्षांनुवर्ष सुरू असलेल्या सीमाप्रश्नाची झळ मराठी चित्रपटालाही बसली आहे. सीमावर्ती भागातील परिस्थितीवर प्रकाश टाकणाऱ्या ‘मराठा टायगर’ या चित्रपटावर कर्नाटक सरकारने बंदी घातली आहे. सेन्सॉरकडून संमत झाल्यानंतरही केवळ मराठी-कानडी जनतेत संघर्ष वाढेल, असा बागुलबुवा उभा करत कर्नाटक सरकार चित्रपटावर रोख लावत असल्याचा आरोप निर्माते अभिजीत ताशेलदार यांनी केला आहे.

२०१४ च्या जुलैमध्ये येल्लूरमधला ‘महाराष्ट्र राज्य’ असे लिहिलेला चौथरा कर्नाटक सरकारने दडपशाही करून पाडून टाकला. येल्लूरच्या घटनेसह सीमाभागातील मराठी जनतेची गळचेपी कशाप्रकारे केली जात आहे याचे चित्रण ‘मराठा टायगर’ या चित्रपटात करण्यात आले आहे. हा चित्रपट सीमाभागात दाखवण्यात आला तर तणावाची परिस्थिती निर्माण होईल, असे कारण पुढे करत कर्नाटक सरकारने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली असल्याची माहिती अभिजीत ताशेलदार यांनी दिली.

या चित्रपटात सीमाभागात राहणाऱ्या मराठी तरुणाची भूमिका करणाऱ्या अभिनेत डॉ. अमोल कोल्हे यांनीही चित्रपटाविषयी कर्नाटक सरकारने घेतलेली विरोधी भूमिका दुर्दैवी असल्याचे सांगितले. सीमाप्रश्न आता न्यायप्रविष्ट आहे आणि एखादा चित्रपट पाहून न्यायालय आपली भूमिका बदलेल, हा तर्काला सोडून असलेला विचार कर्नाटक सरकार पुढे दामटत असल्याचेही त्यांनी सांगितले.