पुष्पसंपदा वाचविण्यासाठी निसर्गप्रेमी संघटनांची पर्यटकांना साद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या १० वर्षांत वाढत्या पर्यटनाने प्लास्टिक, कचऱ्याचा खच पडत असल्यामुळे कास पठारावरील फुलांना धोका निर्माण झाला आहे. यासाठी पुण्यातील पर्यावरणवादी संघटना आणि निसर्गप्रेमींनी ‘कासला माफ करा, फुलांना जगू द्या’ अशी मोहीम हाती घेतली आहे. सध्या समाज माध्यमांवर ही मोहीम सुरू असून निसर्गाला आणि फुलांना वाचविण्यासाठी कास पठारावर जाऊ नका, असे आवाहन निसर्ग संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे.

पुण्यामधील काही पर्यटन कंपन्यांनी २००० मध्ये कास-ठोसेघर परिसरात पर्यटन सुरू केले होते. यानंतर दोन-तीन वर्षांत पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे दर वर्षी पावसाळ्यादरम्यान कास पठारावर धडकू लागले. पुष्पसंपदा वाचविण्यासाठी वन विभागाने फुलांभोवती कुंपण घातले आहे. मात्र त्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. दर वर्षी तेथे जाणाऱ्या पर्यटकांकडून फुलांची नासधूस केली जात आहे. फुले तोडणे, फुलांवर लोळून फोटो काढणे, फुलांवर दुचाकी वाहन घेऊन जाणे यामुळे फुलांची वाढ खुंटत आहे. दर वर्षी पर्यटकांचे लोंढे येतच राहिले तर येत्या काही वर्षांत कास पठारावर फुले उगवणार नाहीत, अशी भीती पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या कास पठारावर वास्तव्यासाठी हॉटेल्स बांधण्यात आली आहेत. त्यामुळे भविष्यात पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यावर पुण्यातील वाइल्ड संघटना आणि काही निसर्गप्रेमींनी मिळून ‘कास पठारावर जाऊ नका,’ असे आवाहन केले आहे.

ऑनलाइन बुकिंगचा पर्याय

कासचे पुष्प पठार सुटीच्या काळात पर्यटकांनी फुलून गेले आहे. हे पठार पर्यटकांसाठी खुले झाले असून पर्यटकांनी निराशा टाळण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करावे, असे आवाहन वनाधिकारी यांनी केले. नियोजनासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे उपवनअधिकारी अनिल अंजलकर यांनी सांगितले. पठार पाहण्यासठी सशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच दिवशी सुमारे तीन हजार पर्यटकांनी ऑनलाइन बुकिंग केले होते.

गेल्या वषी सुमारे पाच लाख पर्यटकांनी या पठाराला भेट दिली होती. राज्यातून येणाऱ्या पर्यटकांची गरसोय होऊ नये म्हणून वन विभागाने ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था केली आहे. गर्दीचे नियंत्रण व्हावे तसेच पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यासाठी ही सोय अवलंबली असून या परिसरातील गावांच्या विकास कामासाठी प्रवेश शुल्काचा निधी वापरला जातो. यात वाहनांसाठी तसेच पर्यटकांसाठी शुल्क आकारले जाते त्याचबरोबर छायाचित्रणासाठीही शुल्क आकारले जाते. कास पठारावरील फुलांची माहिती देण्यासाठी १५ जणांच्या गटाला मार्गदर्शकाची व्यवस्था सशुल्क करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन अंजलकर यांनी केले आहे

पठारावर येणाऱ्या पर्यटकांना ऑनलाइन बुकिंग करावे लागेल त्यासाठी www.kas.ind.in  या संकेतस्थळावर आगाऊ नोंदणी करावी. सुटीच्या दिवशी होणारी गर्दी व वाहनांची गर्दी-कोंडी लक्षात घेऊन तीन हजार पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश शुल्क तसेच इतर सर्व माहिती संकेतस्थळावर दिली आहे.

पर्यटनाची वाळवी..

कास पठाराचा विषय हातातून गेला आहे, याला रोखणे कठीण आहे. कास पठारावर पर्यटन झाले नाही तर लोकांचे नुकसान होणार नाही. मात्र लोकांच्या गर्दीमुळे फुलांचे आणि निसर्गाचे नुकसान होत आहे. कास पठाराला पर्यटनाची वाळवी लागली आहे. आम्ही सुरू केलेल्या मोहिमेमुळे अनेकांनी कास पठाराला न जाण्याचे ठरविले याबद्दल मला आनंद आहे, असे वाइल्ड संघटनेचे शेखर नानजकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील अनेक पठरांवर भीषण परिस्थिती आहे. अनेक निसर्गरम्य ठिकाणांवर कचरा, प्लास्टिकचा खच पाहावयास मिळतो. अशा ठिकाणी पर्यटकांवर नियम घालूनही सुधारणा होत नाही. यासाठी पर्यटकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. निसर्गाचा आस्वाद घेत असताना पर्यावरण सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे, याची जाणीव असणे आवश्यक आहे.

– आनंद पेंढारकर, स्प्राऊट्स संघटना

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kas pathar flower valley
First published on: 19-09-2016 at 02:32 IST