अजमल कसाब याने तुरूंगात असताना कधीही मटन बिर्यानी मागितली नव्हती. केवळ जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी मी तसे म्हटले होते, असा खुलासा २६/११ हल्ल्याच्या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला. ते शुक्रवारी जयपूर येथील दहशतवादविरोधी परिषदेत बोलत होते. निकम यांच्या या एका विधानामुळे त्यावेळी २६/११ खटल्याचे कामकाज जलदरित्या व्हावे, या मागणीने जोर धरला होता. अफझल गुरू , कसाब किंवा भारतीय नौदलाकडून बुडविण्यात आलेल्या पाकिस्तानी नौकेचे प्रकरण या सगळ्या घटनांची चर्चा होते तेव्हा, लक्ष वेधून घेण्यासाठी ‘त्यांना बिर्यानी का खायला घालत आहात’, असा प्रश्न सहजपणे केला जातो. याच गोष्टीचा धागा पकडून निकम यांनी ते विधान केले होते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, अशावेळी प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने आणि निरीक्षकाची भूमिका बजावली पाहिजे. अशाप्रकरणांत प्रसारमाध्यमे संबंधित कैदी म्हणजे बळीचा बकरा आहे, असे वातावरण निर्माण करतात. ही गोष्ट चुकीचे असल्याचे मत यावेळी निकम यांनी व्यक्त केले. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेल्या वातावरणामुळे लोकांच्या विचार करण्याचा पद्धतीत फरक पडत असल्याचे मी पाहत होतो. त्यामुळे मी स्वत:हून ‘कसाबने बिर्यानी मागितली होती’, असे विधान करून, लोकांचे लक्ष वेधून घेतले. कसाब खटल्याच्या सुनावणीदरम्यान भावनिक होतो आणि रडतो , या प्रसारमाध्यमांतील बातम्यांमुळे तेव्हा फार गोंधळ माजला होता. कसाबला त्यावेळी पश्चाताप होत नव्हता, तो फक्त तशी बतावणी करत होता. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी न्यायालयाबाहेर अशाप्रकारे समांतर खटला चालवू नये, असे निकम यांनी म्हटले.
उज्ज्वल निकम यांनी दिलेल्या कबुलीनंतर आता त्यांच्यावर टीकाही केली जात आहे. न्यायालयाशी संबंधित व्यक्तीने कधीही अशाप्रकारची वक्तव्ये करू नयेत, असे मत ज्येष्ठ वकील रोहिणी सालियन यांनी व्यक्त केले. न्यायालयात असताना आपण जनता आणि समाजाचे प्रतिनिधी असतो. न्यायालयातील अधिकारीक व्यक्ती म्हणून मी अशा कोणत्याही निष्कर्षाप्रत येणे योग्य नाही. न्यायालयासमोर सत्य परिस्थिती मांडणे माझे कर्तव्य असून त्याच्या निकालाबाबतचा निर्णय आपण न्यायालयावर सोपवला पाहिजे. एक वकील म्हणून आपण कधीही पक्षपात करता कामा नये असे सालियन यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kasab never asked for mutton biryani i cooked it up ujjwal nikam
First published on: 21-03-2015 at 12:14 IST