निर्माता – दिग्दर्शक करण जोहर यांच्या ‘स्टुडंट्स ऑफ द इयर’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण केलेल्या कायोज इराणी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट ‘सरजमीन’ सध्या जिओ हॉटस्टार या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर यांच्या धर्मा प्रॉडक्शनचीच आहे आणि त्यांच्याच विचारांचा वा दिग्दर्शन शैलीचा प्रभाव कायोज यांच्यावरही आहे असं जाणवतं. त्यामुळे एका कट्टर दैशभक्त सैन्यदलातील अधिकाऱ्याची आणि त्याच्या मुलाची कथा रंगवताना नेमकी देशप्रेमाची गोष्ट सांगायची की बाप-लेकामधलं रुसव्या-फुगव्या पलिकडे असलेलं अजब तणावपूर्ण नातं रंगवायचं तेही व्हाया आईच्या भूमिकेतून… याचा पार गोंधळ आहे. आता हे नेमकं काय त्रांगडं आहे हे चित्रपट पाहिल्याशिवाय कळणार नाही, पण सरजमीन के मोहोब्बत की दास्ताँ रंगवताना तर्काच्या पार चिंधड्या करून टाकल्या आहेत.
या चित्रपटाचा विचार करताना दिग्दर्शक म्हणून कायोज यांनी व्यक्तिरेखांचा विचार न करता त्यातील कलाकारांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचा प्रभाव याचाच जास्त विचार केलेला दिसतो. कर्नल विजय मेनन या सैन्य अधिकाऱ्याची भूमिका करण्यासाठी दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन, त्याची पत्नी मेहेरच्या भूमिकेत अभिनेत्री काजोल आणि त्यांचा मुलगा हर्मनच्या भूमिकेत इब्राहिम अली खान या तिघांची व्यक्तिरेखेच्या अनुषंगाने निवड केली आहे, असं वाटतच नाही. उलट या तिघांच्या निवडीनुसार व्यक्तिरेखांचं चित्रण केलं आहे असंच जाणवत राहतं. हे तिघंही तीन ध्रुवावरचे तीन तारे असल्यागत चित्रपटात वावरले आहेत. आणि कितीही सरजमीन या नावाने देशाप्रती असलेलं प्रेम, त्याग, समर्पण यांची गोष्ट आहे अशी ओरड केली तरी प्रामुख्याने ही कौटुंबिक नात्याची आणि विशेषत: वडील – मुलाच्या नात्याचीच गोष्ट आहे. जम्मू – काश्मीरमध्ये नियुक्तीवर असलेल्या कर्नल विजय मेनन यांच्यावर काश्मीरमध्ये लागोपाठ स्फोट घडवून आणणारा दहशतवादी मोहसीन याला पकडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विजय मोहसीनचा घातपाताचा बेत उधळून लावू शकत नाही, मात्र त्याच्या दोन भावांना पकडण्यात त्याला यश येते. या सगळया कामात सीमेपलिकडून एका अज्ञात व्यक्तीची मदत विजयला मिळते, मात्र ही व्यक्ती कोण त्याचा थांगपत्ता त्याला काही लागत नाही. दरम्यान, या सगळ्या घडामोडीत विजयची आणि त्याच्या मुलाच्या हर्मनच्या गोष्टीचाही एक पदर आहे. आपला मुलगा दणकट नाही, तो बोलताना अडखळतो, कमकुवत आहे ही गोष्ट विजयला राहून राहून खटकते आहे. त्यामुळे तो मुलाशी अंतर राखून आहे. आपल्या वडिलांचं आपल्यावर अजिबात प्रेम नाही हे हर्मन मनोमन ओळखून आहे. फक्त आईमुळे तो त्यांच्याशी अजून बांधलेला आहे. या सगळ्याचा फायदा दहशतवादी घेतात. आणि मोहसीनच्या भावांना सोडण्याच्या मागणीसाठी हर्मनचं अपहरण करतात. अर्थात, देशभक्त सैनिक आपल्या मुलाला वाचवण्यापेक्षा देशाप्रतीच्या आपल्या कर्तव्याला महत्त्व देतो. आपल्या मुलाला आपण गमावून बसलो आहोत, या विचाराने आयुष्याची गाडी पुढे हाकणाऱ्या कर्नलची आठ वर्षांनी पुन्हा एकदा मुलाशी गाठभेट होते. यावेळी मात्र मुलगा दहशतवाद्याच्या रुपात त्याच्यासमोर उभा ठाकतो. आता पुन्हा बापासमोर प्रश्न आहे, मुलगा की देश?
कथानक ऐकलं की कसं एकदम भारी वाटतं ना… बाप – लेकाच्या नात्यातल्या तणावाची गोष्ट. एक सैनिक आणि दुसरा दहशतवादी… काय होईल? काय होईल? काही होत नाही. म्हणजे हा धागा चित्रपटात महत्त्वाचा आहेच, पण दोघं बापलेक ना फार समोरासमोर येत आणि आले तर एकमेकांशी धड बोलतही नाहीत. या दोघांमधला दुवा म्हणजे मेहेर. विजयची पत्नी आणि हर्मनची आई… तिची भूमिका काय असेल? या सगळ्यात… तर कथेची मांडणी करताना प्रत्येक व्यक्तिरेखेला समसमान दर्जा द्यायला हवा, त्यामुळे कथाप्रकाराचा जो खेळखंडोबा केला आहे त्याला तोड नाही. काश्मीरमधील ताणतणाव, दहशतवादी हल्ले, काफिर…. हे सगळे मुद्दे फक्त तोंडी लावण्यापुरते. चित्रपटाची कथाच इतकी भुसभुशीत आणि तकलादू पायावर रचण्यात आली आहे की चित्रपटातील कलाकार ताकदीचे असूनही त्याचं काही करू शकलेले नाहीत. विजयच्या हाताखालचा अधिकारी अहमदची भूमिका अभिनेता जितेंद्र जोशी याने केली आहे. त्याचा वावर बघून आनंदच वाटतो, पण त्यालाही तितका वाव दिलेला नाही. मात्र, तो वगळता काजोलची व्यक्तिरेखा मोठी की पृथ्वीराजची मोठी… नको या दोघांबरोबरच इब्राहिमसाठीही काहीतरी हवं… म्हणून भावनिक नाट्य रंगवण्यासाठी नको ती वळणे… मसाला… या भडिमारात चित्रपट पाहणाऱ्यांची अवस्था दिल के तुकडे तुकडे… अशी झाली नाही तरच नवल.
सरजमीन
दिग्दर्शक – कायोज इराणी
कलाकार – पृथ्वीराज सुकुमारन, काजोल, इब्राहिम अली खान, जितेंद्र जोशी आणि बोमन इराणी.