किनन आणि रुबेन यांच्या हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने चारही आरोपींना दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी सुनील, सतीश, दीपक आणि जितेंद्र राणा यांनी २०११ साली किनन आणि रुबेन या दोन तरुणांची हत्या केली होती. अंधेरीतील अंबोली रेस्टॉरंटमध्ये आपल्या मैत्रिणीची छेड काढणाऱया या चौघांना किनन सँतोज(२४) आणि रुबेन फर्नांडिस(२८) यांनी विरोध केला होता. त्यानंतर झालेल्या बाचाबाचीचे प्रकरणी हाणामारी आणि हत्येपर्यंत जाऊन पोहोचले. किनन आणि रुबेन यांच्या मैत्रिणीची छेड काढणाऱया चौघांनी भर रस्त्यात चाकूने भोसकून त्या दोघांची हत्या केली होती. घटनेच्या दुसऱयाच दिवशी चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी आज सत्र न्यायालयाता झालेल्या सुनावणीत चारही नराधमांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली.

एकूण २८ साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली होती. यामधील पाच जण घटनास्थळी उपस्थित होते. साक्षीदारांमध्ये किनन आणि रुबेन यांच्या दोन पिडीत मैत्रिणींचाही समावेश होता. त्यामुळे आरोपी छेड काढण्याचा आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ठोस न्यायालयाला मिळाले, असे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. पिडीतांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न देखील केला होता. पण आरोपींना धारधार हत्यारांनी किनन आणि रुबेन यांची हत्या केली होती, असेही निकम पुढे म्हणाले.

दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयावर किननचे वडील वालेरियन सँतोज यांनी समाधान व्यक्त केले आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा मला आनंद आहे. चारही दोषींना कारागृहात रोज किनन आणि रुबेनची आठवण आली पाहिजे. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ नसल्याची मला कल्पना असल्याने चौघांना फाशी होणार नाही, हे माहित होते. म्हणूनच चौघांना जन्मठेप व्हावी हीच माझी मागणी होती आणि न्यायालयाने ती मान्य केली, असे किननचे वडिल म्हणाले.