राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सुरू के लेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. करोनाविरुद्धच्या लढाईत आव्हानात्मक परिस्थितीत काम करणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांचे कौतुक करतानाच, राज्यात कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष ठेवा, अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यपालांनी सोमवारी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसेच करोना रुग्ण अधिक असलेल्या जिल्ह्य़ातील जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन विषाणू फैलावास प्रतिबंध करण्याबद्दल शासकीय स्तरावर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

करोनाविरुद्ध लढय़ात राज्य सरकारने आतापर्यंत चांगले काम केले आहे. मात्र निजामुद्दीन येथे मरकजमध्ये सहभागी होऊन राज्यात परतलेल्या लोकांमुळे वाढत असलेल्या करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विशेष जागरूकता ठेवावी, तसेच कोठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी या वेळी विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना दिल्या.

देशात करोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राष्ट्रपतीही नियमितपणे राज्यातील स्थितीचा आढावा घेत आहेत. यादृष्टीने राज्यातील करोनाच्या रुग्णांची संख्या आणि सद्य:स्थिती, शासन करीत असलेल्या उपाययोजना, उपलब्ध वैद्यकीय सुविधा, वैयक्तिक सुरक्षा साधनांची उपलब्धता, स्थलांतरित कामगार, मजूर आणि बेघर यांच्यासाठी केलेली निवारा व भोजनव्यवस्था, शेतमाल विक्रीसाठी केलेल्या उपाययोजना, मदतकार्यात अशासकीय संस्थांचा सहभाग इत्यादी विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

स्थलांतरित कामगार, मजूर आणि बेघर लोकांसाठी सुरू केलेल्या शिबिरांमध्ये सर्वाना भोजन, औषधे देण्याबरोबरच तेथील स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना राज्यपालांनी दिल्या.

मुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, कोकणचे विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिलीप म्हैसेकर, औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, नागपूर विभागीय आयुक्त संजीव कुमार, अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंग व नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने तसेच मुंबई शहर, उपनगर, रायगड, ठाणे, पुणे, सांगली, अहमदनगर, नागपूर, यवतमाळ, बुलढाणा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या अखत्यारीतील करोना व स्थलांतरित लोकांच्या व्यवस्थेची माहिती दिली.

आरोग्य कर्मचारी, पोलिसांचे कौतुक

करोनाविरोधातील लढय़ात आघाडीवर असलेले डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवा कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी तसेच जीवनावश्यक सेवा-सुविधा पुरविणारे कर्मचारी आव्हानात्मक परिस्थितीमध्ये काम करीत आहेत, त्याबद्दल त्यांचे कौतुक करतानाच त्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देऊन त्यांचा उत्साह वाढविण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keep an eye on the law and order in the state governor abn
First published on: 08-04-2020 at 00:33 IST