मूलबाळ नसल्याने म्हातारपणात आधार मिळावा म्हणून आपल्या मेव्हणीचा मुलगा पळवून आणण्याची धक्कादायक घटना नागपाडा येथे उघडकीस आली आहे. घटना घडल्यापासून अवघ्या ७२ तासांत जेजे मार्ग पोलिसांनी या मुलाची उत्तर प्रदेशमधून सुखरूप सुटका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपाडय़ाच्या दोन टाकी स्ट्रीट येथे शमशाद शेख, पत्नी रुबिना आणि समीर, अमीन आणि समद या तीन मुलांसोबत राहतात. ५ जुलैला सकाळी तीनही मुले घराबाहेर खेळत होती. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मोठा मुलगा समीर घरी धावत आला. त्याने रुबिनाच्या बहिणीचा नवरा शानमोहम्मद समदला घेऊन निघून गेल्याचे सांगितले. घाबरलेल्या रुबिनाने बहीण नुस्सरतला तिचा नवरा शानमोहम्मद कुठे गेलाय, हे विचारले. पण, शानमोहम्मद सकाळीच घराबाहेर पडला असून अद्याप परतला नसल्याचे तिने सांगितल्यावर रुबिनाच्या चिंतेत भर पडली.

दिवसभर दोघांचा शोध घेऊनही तो न सापडल्याने मध्यरात्री शमशाद शेख यांनी शानमोहम्मदच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला.

त्या वेळी, ‘समद माझ्याकडेच आहे. पण, मी त्याला तुम्हाला परत देणार नाही. मी त्याला शिक्षण देऊन मोठा करेन. माझ्या म्हातारपणात तो माझी काळजी घेईल,’ असे सांगितले. हादरलेल्या रुबिनाने अखेर ६ जुलैला जेजे मार्ग पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डॉ. मनोजकुमार शर्मा, साहाय्यक पोलीस आयुक्त मंगेश पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात झाली. तपासात शानमोहम्मदची पत्नी नुस्सरतही सहकार्य करत होती. तिच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांचे पथक शानमोहम्मदची नाशिक येथे राहणारी बहीण हाजरुनिस्सा शमीम या बहिणीकडे रवाना झाले.

पोलिसांना हाजरुनिस्सा हिने माहिती दिली की शानमोहम्मद घरी आला होता, त्याच्यासोबत एक लहान मुलगाही होता, पण तो लगेचच निघून गेला. अवघ्या काही तासांसाठी पोलिसांना शानमोहम्मदने हुलकावणी दिली. ही माहिती वरिष्ठांना कळविल्यानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण मोहिते, हवालदार राऊत आणि केरुर यांचे एक पथक समदचे वडील शमशाद शेख यांच्यासह उत्तर प्रदेशातील छिकनापूर येथे रवाना झाले.

कटरा बाजार पोलिसांच्या मदतीने पथकाने शानमोहम्मदचा शोध घेतला. त्याच्या राहत्या घरी पथकाला समद सापडला. पण, शानमोहम्मद मात्र कुठेच दिसला नाही. पोलिसांनी समदला ताब्यात घेतले आणि शानमोहम्मदचा शोध घेतला, परंतु, तो फरार झाल्याचे लक्षात आले.

अवघ्या ७२ तासांत पोलिसांनी तपास करत दोन वर्षीय समदला शोधून काढले. चौकशीत शानमोहम्मदचे समदच्या कुटुंबीयांशी वादही होते. मूलबाळ नसल्याने त्यांच्या मुलाला पळवून त्यांना अद्दल घडलविण्याचा आणि आपल्या म्हातारपणाला आधार मिळविण्यासाठी हा कट त्याने रचल्याचे स्पष्ट होत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उद्धवराव करांडे, तपास अधिकारी बावधनकर यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kidnaped sister in law child in nagpada
First published on: 14-07-2016 at 00:05 IST