एकतर्फी प्रेमातून एका तरुणीचे अपहरण करण्यात आले. मात्र प्रसंगावधान दाखवून या तरुणीने स्वत:ची सुटका करवून घेतली. भांडुप पोलिसांनी या प्रकरणी पाच तरुणांना अटक केली आहे.
भांडूपमध्ये राहणाऱ्या १९ वर्षांची ही तरुणी रविवारी संध्याकाळी भांडुप येथील एलबीएस रोडवरून बहिणीला आणायला जात होती. त्यावेळी एक तवेरा गाडी तिच्याजवळ येऊन थांबली. गाडीत असलेल्या पाच तरुणांनी तिला जबरदस्तीने गाडीत बसवले. तिचे तोंड बांधून ठेवल्याने तिला मदतीसाठी कुणाला बोलावताही आले नाही. आपली सुटका होणार नाही हे लक्षात आल्यावर तिने झोपेचे सोंग घेतले. ही गाडी मुंबई-गोवा महामार्गावरून पेण येथे आली. तेथील एका ढाब्यावर हे तरुण जेवणासाठी उतरले. त्या वेळी या तरुणीने प्रसंगावधान दाखवून गाडीतून पळ काढला आणि तेथे असलेल्या एका महिलेकडे मदत मागितली. त्या वेळी गावातील सरपंच आणि इतर ग्रामस्थांनी येऊन या तरुणांना चोप दिला आणि पोलिसांना बोलावले.
मुलीच्या कुटुंबीयांनाही कळविण्यात आले आणि त्यांनी रात्री पेणला जाऊन तिला ताब्यात घेतले. तिच्या फिर्यादीवरून भांडुप पोलिसांनी विजय दोषीलकर (२५), अनंता वाघ (२५), अनिकेत घाटगे (२५), संतोष घाटगे (२५), हेमंत माने (२७) आणि रवी सोनार (२९) यांना अटक केली आहे. विजय दोषीलकर हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याचे सीमावर एकतर्फी प्रेम होते. मात्र सीमाने नकार दिल्याने त्याने अपहरणाचा
कट रचला.