गिरगाव येथे राहणाऱ्या हिरे व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या सर्व अपहरणाच्या डावामागे व्यापाऱ्याच्या भावाचाच हात असल्याचे तपासाअंती कळले.

गिरगाव येथील ९वी खेतवाडी भागातील पावापुरी इमारतीत राहणाऱ्या जितेंद्र रांका या हिरे व्यापाऱ्याच्या आदित्य (१३) या मुलाचे सोमवारी दुपारी अपहरण झाले होते. अपहरणानंतर काही वेळाने जितेंद्र रांका यांना ३० लाखांच्या खंडणीची मागणी करणारा फोन आला. सुरुवातीला आपली कोणी चेष्टा करत असावे, असे राणका यांना वाटले. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत आदित्य घरी न परतल्याने रांका यांनी पोलिसांत धाव घेतली. काही दिवसांपूर्वीच एका व्यवहारात राणका यांना ३० लाख रुपये मिळाल्याची माहिती जितेंद्र यांनी पोलिसांना दिली.

त्यावरून अपहरणकर्ता कोणीतरी माहितीतलाच असावा, असा संशय पोलिसांना आला. संशयाची सुई जितेंद्र यांचा भाऊ हिमांशुकडे वळली. पोलिसांनी हिमांशुला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्या वेळी हिमांशूने दिलेला कबुलीजबाब ऐकून पोलिसांच्या अंगावरही शहारे आले.

आपल्या भावाला३० लाख रुपये मिळाल्याची माहिती हिमांशुला होती. त्यामुळे ‘तुला फिरायला नेतो’ असे सांगून हिमांशुने आदित्यला आपला मित्र ब्रिगेश संघवी याच्या होंडा सिटी या गाडीतून खालापूर येथे नेले. त्यानंतर हिमांशु आणि त्याच्या मित्रांनी आदित्यचा खून केला.

हिमांशुने दिलेल्या माहितीवरून पोलिसानी ब्रिगेश संघवी यालाही ताब्यात घेतले. ब्रिगेशच्या गाडीची तपासणी केली असता आदित्यच्या चपला आणि रक्ताचे डाग सापडले. पोलिसांचे एक पथक मंगळवारी पनवेलला रवाना झाले. तेथून आदित्यचा मृतदेह ताब्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.